देवदूत डॉ.बापट* *विलास खरात,आटपाडी

 

लोकदर्शन आटपाडी 👉 राहुल खरात

औंध संस्थानच्या अखत्यारित आटपाडी गांव व त्या खालील बत्तीस गांवे व वाड्या वस्त्याचा समावेश औंध संस्थानात होता, संस्थान कालीन आटपाडी या गांवास “महाल”म्हणून तालुक्याचा दर्जा दिलेला होता, संस्थानचे राजे श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी हे राज्यकारभार जनतेच्या न्यायाचा, हिताचा व सोयीचा कारभार करीत त्यामुळे संस्थानला प्रजा हित दक्ष राजा मिळालेले असलेमुळे संस्थानची सामाजिक , आर्थिक व शैक्षणिक प्रगती होत होती, संस्थानचे राजपुत्र बॅ. आप्पासाहेब पंत प्रतिनिधी यांनी संस्थानसाठी योगदान दिलेले आहे. त्या औंध संस्थान गांवचे बापट घराण्याचा थोडक्यात जीवन पट पाहू या.
औंध संस्थानने संस्थानचे महसुली कामकाजासाठी वरिष्ठ गांव कामगार तलाठी म्हणून सन १९२१-२२ सालच्या दरम्यान आटपाडी येथे श्री. भास्कर बापट यांची नेमणूक केली होती, त्यामुळे तलाठी म्हणून आटपाडी गांवात कार्यरत होते. त्यावेळी भास्कर बापट हे वडगांवकराच्या वाड्यात कुटुंबासह राहत असत, कालांतराने भास्कर बापट यांचे चिरंजीव श्रीधर भास्कर बापट हे औंध संस्थानचे आटपाडी महालाचे मामलेदार म्हणून सन १९३७ साली त्यांची नियुक्ती झालेली होती, त्यामुळे ते आटपाडी महालाचे मामलेदार म्हणून कारभार सांभाळत असत. त्यानंतर श्रीधर भास्कर बापट यांचे सुपुत्र डॉ.जगन्नाथ बापट यांचा जन्म औंध येथे सन १९१९ रोजी झालेला आहे.ते नवसाचे असलेमुळे त्यांचे नाव जगू अर्थात जगन्नाथ असे ठेवलेले होते. त्यांचे शालेय शिक्षण औंध संस्थानात झाले, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुणे येथील बी.जे. मेडिकल मधून एल.सी.पी.एस (अॅलोपॅथीचे) डॉक्टर म्हणून शिक्षण झालेवर त्यांची डॉक्टर म्हणून प्रथम नियुक्ती सोलापूर शासकीय रुग्णालयात झाली होती. काही महिने काम केले नंतर तेथून ते गुजरात येथील अहमदाबाद शहरात डॉक्टरची नोकरी करीत होते.
औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांना समजले नंतर त्यांनी डॉ. जगन्नाथ बापट यांची माहिती घेतली व त्यांना बोलावून घेतले व त्यांची सन १९४२ साली आटपाडी येथे पहिले औंध संस्थानचे डॉक्टर म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी आटपाडी येथे सन १९४२ ते १९४९ पर्यंत ते आटपाडी येथे संस्थांनचे डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सन १९४९ साली संस्थाने त्यांची नियुक्ती बेळगाव येथील हिडंलगा कारागृहात कैद्याचे डॉक्टर म्हणून केली होती. त्या ठिकाणी ते हजर झाले. डॉक्टर म्हणून काम करून लागले. परंतु सदर ठिकाणच्या नोकरीत फारसे रमले नाहीत. त्यामुळे आटपाडीतील लोकांच्या खास आग्रहास्तव त्यांनी आटपाडीत येण्याचा निर्णय घेऊन त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता.
सन १९५१ मध्ये आटपाडी येथे येऊन खाजगी प्रॅक्टीस सुरू केली. त्यावेळी नारायण देशपांडे यांचे जागेत खाजगी दवाखाना त्यांनी सुरू केला होता व आटपाडीच्या जनतेची आरोग्याची सेवा करू लागले होते. त्यावेळीस त्यांचे अगदी जीवाभावाचे मित्र श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे कडे डॉ.बापट यांचे जाणे- येणे होत असे. डॉ. बापट यांच्या पत्नी सौ. शकुंतला बापट यांनी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांना आटपाडी गांवात घर बांधायला जागा देता का ? अशी विनंती केली होती. त्या वेळी श्रीमंत बाबासाहेब देशमुख म्हणाले, माझ्याच घरासमोर जागा आहे, परंतु सदर जागेत अनेकांचा हिस्सा आहे, असे म्हणून थोड्या दिवसानंतर त्यांनी सर्वांशी जागे बाबत विचार विनिमय करून सर्वांना राजी केले. त्यामुळे सदरची जागा डॉ. जगन्नाथ बापट यांना मिळाली होती. त्यानंतर सदर जागेत घराचे बांधकाम सन १९५४ साली सुरू केले. आटपाडी व खरसुंडी येथील गवंडी व मजुरांनी घराचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर सन १९५६ साली डॉ. जगन्नाथ बापट आपल्या परिवारासह सदर वास्तूत राहू लागले होते. आजतगाईत दगडी बांधकाम केलेली वास्तू मजबूत व दणकट आहे. त्या वास्तूतच राहतात आणि आज ही दवाखाना सुरू असून जन आरोग्याचे व्रत नियमित पणे पुढील पिढीने सुरू ठेवलेले आहे.
डॉ.जगन्नाथ श्रीधर बापट यांना आटपाडीतील लहान- थोर मंडळी “आप्पा” या नांवाने संबोधित असत. डॉ. जगन्नाथ आप्पाना चार भाऊ व बहिनी असा परिवार होता. सर्वांच्यावरआप्पा जीवापाड प्रेम करीत असत.त्यानंतर डॉ. जगन्नाथ बापट यांना सुधा, विकास व जयंत अशी तीन अपत्ये झाली. त्यापैकी डॉ.विकास बापट हे आटपाडीतील पहिले सर्जन डॉक्टर त्या वेळी झालेले होते. आणि दुसरे डॉ. जयंत हे आहेत. डॉ. जगन्नाथ श्रीधर बापट यांनी या भागात अपार लोकसेवा, कष्ट व मेहनत केली आहे. सदरच्या काळी आटपाडी येथील जनतेची आरोग्याची सेवा करीत त्यांनी दिघंची, पिलीव, हतीद, चोपडी, करगणी, खानापूर, तामखडी रेणावी या भागातील आसपासच्या वाड्या व वस्त्यांना, गावांना भेटी देऊन पेशंट वरती उपचार करीत असत. लोकांची आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून जन आरोग्याचा वसा घेतलेला होता.
लोकांच्या तपासणीचे व उपचाराचे दिवस ठरलेले असत. त्याप्रमाणे ते आटपाडी, भिंगेवाडी,करगणी,गोमेवाडी,नेलकंरजी, भिवघाट असे पेशंट तपासून औषधे, इंजेक्शन देत असत. त्यानंतर ४ वाजेपर्यंत खानापूरला पोहचत असत. त्यावेळी बैलगाडीतून अनेक पेशंट येत असत. त्यामध्ये हिरवे, पळशी, कंरजे, बेनापूर व सुलतानगादे येथील सुद्धा पेशंट येत असत. सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस खानापूर भागातील गावांना भेटीसाठी दिलेले असत. त्यामुळे त्यांना रात्री आटपाडीला यायला बराच उशीर व्हायचा. त्यावेळी ऊन, वारा, पाऊस याची कधी त्यांनी तमा केली नाही, त्यामुळे डॉ. जगन्नाथ बापट हे त्या काळी लोकांना देवदूत वाटत असत.
या भागातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी जाणे-येणेसाठी विलिक्स कंपनीची मिलिटरी मॉडेलची लहान जीप वापरत असत. सदरची जीप त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी घेतलेली होती. आटपाडी गांवात पहिलीच जीप होती.सदर जीप मधून या भागातील लोकांची आरोग्याची सेवा करीत होते. त्यानंतर सन १९६२ साली विधानसभेच्या निवडणुकी वेळी सांगोला मतदार संघातून निवडणूक लढवनारे भाई. गणपतराव देशमुख यांनी सदरची विलिक्स कंपनीची गाडी रुपये २२००/-ला खरेदी केली होती. सदर जीप घेण्यासाठी गावरवाडीचे त्यांचे बंधू देशमुख व नानासाहेब लिगाडे यांनी गाडी घेण्यासाठी सहकार्य केले होते. त्यावेळी सदर जीप मधून त्यांनी प्रचार करून निवडणुकीमध्ये निवडून सुद्धा आले होते. सदरच्या काळी आटपाडी, सांगोला, माण, खानापूर या भागात फारसे डॉक्टर येत नव्हते. त्यामुळे या भागातील अनेक आजारी रुग्णांना डॉ. बापट यांनी अल्प मोबदल्यात किंवा त्या पेशंटची आर्थिक परिस्थिती पाहून जी रक्कम येईल ती घेऊन आजारी रुग्णाची सेवा मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी चांगल्या प्रकारे करीत होते. त्या वेळी पेशंटची फी साधारण दोन ते अडीच रुपये इंजेक्शन व औषध गोळ्याचे घेत असत.पेशंटची आस्थेवाईक पणे चौकशी करत असत. डॉ.जगन्नाथ बापट यांनी महिलांच्या प्रसूती बाबत खूप मोठी सेवा केलेली आहे. त्यांनी अनेक महिलांना जीवदान दिले आहे. प्रसूतीच्या वेळी बाळाचे हात बाहेर येणे, बाळ आडवे असणे, डोके मोठे असणे वगैरे प्रसुतीत त्यांचा हातखंडा असे महिलांचे बाळतपण सदरच्या काळी ५-१० मिनिटात यशस्वीपणे करीत असत.
डॉ. बापट यांचा एक अनुभव असा आहे की,भिवघाट येथे एका शेतकऱ्यांच्या पोटावर बैलांने सिंग मारले होते, त्यामुळे त्यांची आतडी बाहेर आलेली होती. त्यांच्या नातेवाईकांनी डॉ. बापट यांना विनंती केली की, सदरचा इसम गरीब आहे,आता त्याला तुम्हीच वाचवा काहीतरी मार्ग काडून त्यास जीवदान द्या, अशी विनंती केलेमुळे व पेशंटची परिस्थिती नाजूक पाहून त्यांनी त्यांची आतडी हात ढकलून पोटाला टाके घेतली होते. तो पेशंट बरेच दिवस जगला होता. असे अनेक प्रसंग ग्रामीण भागात यांना आलेले होते.
डॉ.जगन्नाथ बापट(आप्पा) यांचा लोकसंग्रह व मित्र परिवार खूप मोठ्या प्रमाणावर होता. स्वभाव अत्यंत चांगला असलेमुळे ते हसत मुखपणे बोलत असत. अनुभव दांडगा असलेमुळे लोकांशी ते विनम्रपणे वागत असत. त्यांचा रंग गोरा. अंगकाठी, सडपातळ, मजबूत, डोक्यावर पांढरी टोपी, तीन बटणी पांढरा मलमली शर्ट व धोतर असा पेहराव असे. या भागात नावजलेले डॉक्टर म्हणून नावा रूपाला आलेले होते. त्यांच्या प्रमुख जिवलग मित्र मंडळी मध्ये श्रीमंत बाबासाहेब देशमुख , लाळे वकील, रंगलाल कलाल, नारायणराव देशपांडे, भास्करराव देशपांडे, मधुकरराव नेवासकर, पंडितराव कानडे, बाबू काका देशमुख, बद्रुद्दीन वंजारी, भालचंद्र माडगूळकर , नानासाहेब लिगाडे बलवडी वगैरे तसेच बॅ. आप्पासाहेब पंत प्रतिनिधी व ग. दि. माडगुळकर यांचे बरोबर विशेष स्नेह होता. ग. दि. माडगुळकर हे माडगूळला आले नंतर ते डॉ. बापट यांचेकडे जेवत असत.
ग.दि.माडगूळकर यांचे प्रकाशित झालेले प्रत्येक पुस्तक सौ. शकुंतला जगन्नाथ बापट (वहिनीस) सप्रेम भेट देत असत. त्यावेळी ग.दि.मा.डॉ.बापट यांना म्हणत असत. डॉक्टर तुम्हाला या पुस्तकातल काही कळत नाही, त्यामुळे मी वहिनीना पुस्तक भेट देत असतो असे म्हणत असत. तसेच ग. दि. मा. यांचे बंधू भा.दि.माडगूळकर, शाम काका माडगूळकर यांचे बापट घराण्याशी विशेष नाते होते. तसेच विशेषता बॅ.आप्पासाहेब पंत हे डॉ.बापट यांना एकेरी नांवाने हाक मारत असत. बॅ.आप्पासाहेब पंत हे आटपाडीस आले नंतर त्यांचा मुक्काम डॉ. बापट यांचे घरी असत.
साधारण सन १९४४-४५ साली आटपाडी येथे बांधलेले श्री भवानराव म्युनिसिपल कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर (सध्याची नगरपंचायत) आटपाडी, माण, खानापूर, सांगोला या भागातील अनेक गांवचे आजारी लोकांची महत्त्वाची ऑपरेशन करीत असत. सदर ऑपरेशन साठी जळगांव जिल्ह्यातील अमळनेरचे सर्जन डॉ. मस्कर व बॅ.आप्पासाहेब पंताच्या सौभाग्यवती डॉ.नलिनीताई पंत या लेडीज स्पेशलिस्ट (जुनी एम.बी.बी.एस. मधील एफ. आर. सी. एस.) स्त्री रोग तज्ञ सर्जन म्हणून ऑपरेशन साठी हजर राहत असत. डॉ.जगन्नाथ बापट हे या भागातील ऑपरेशन पेशंटची यादी बनवून त्यांना दिलेल्या तारखेस हजर ठेवीत असत. व तिघे मिळून ऑपरेशन करीत असत. तसेच डॉ. नलिनीबाई पंत या भागातील स्त्रियांच्या व लहान मुलांच्या तपासण्या व ऑपरेशन करीत असत. लोकांच्या आरोग्य सेवेसाठी येत असत. त्यांना रोगमुक्त करणेचे काम त्या काळी करत असत.
डॉ. जगन्नाथ बापट (आप्पा) यांची आटपाडी येथे सार्वजनिक क्षेत्रात योगदान दिलेले आहे. त्या मध्ये आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. तसेच दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम पाहिले आहे, त्याचप्रमाणे एस. टी मंडळाचे मानद डॉक्टर, एल. आय. सी. चे डॉक्टर म्हणून सामाजिक कार्य केले आहे. सदरच्या काळी त्यांच्या कुटुंबासाठी सेवा देणारे कंपाउंडर, ड्रायव्हर इत्यादी कामासाठी अनेक वर्षापासून सेवा करणारे मेहबूब शेख, जगन्नाथ आडसूळ, महंमद शेख यांना डॉक्टर यांचेकडे सेवा केलेली आहे. त्यानंतर मंगेश पाठक, सुहास यांनीही सेवा दिलेली आहे.
डॉ. जगन्नाथ श्रीधर बापट यांची एकसष्टी पुणे येथे साजरी करणेचे ठरले नंतर महान साहित्यिक ग.दि.माडगूळकर यांना निमंत्रण देण्यासाठी पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन डॉ.बापट यांची एकसष्टी साजरी करणे बाबतची माहिती दिली. परंतु ग.दि.मा.ना फुफुसाचा आजार असलेमुळे कार्यक्रमास येऊ शकत नाही. म्हणून दिलगिरी व्यक्त करून डॉ.बापट यांना “ज्ञानेश्वरी” हा ग्रंथ स्वतःच्या हातांनी भेट दिलेला होता.
अशा या थोर विभूती असणारे देवदूत डॉ. जगन्नाथ श्रीधर बापट यांचे निधन पुणे येथे शुक्रवार दिनांक २९ जानेवारी १९८२ रोजी झालेले आहे. या भागातील जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणारे महापुरुष डॉ. बापट हे आपणा सर्वांना सोडून गेले. त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी या भागात राहतील. त्यानंतर डॉ.जगन्नाथ बापट यांचे सुपुत्र डॉ. जयंत बापट हे मोठ्या धैर्याने सन १९७५ पासून आटपाडी येथील वडिलांनी स्थापन केलेल्या दवाखान्यात वैद्यकीय सेवा प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यांना वडिलांचा सहवास साधारण ४-५ वर्षाचा मिळालेला होता. वडिलांनी शिकवलेल्या मार्गाने ते जात आहेत. त्यामुळे डॉ. जयंत हे प्रसूती विभागात चांगली सेवा देत आहेत. त्यामुळे डॉ.जयंत बापट यांच्या प्रवासात सुद्धा चांगले मित्र लाभले आहेत. त्यामध्ये डॉ. एम. वाय. पाटील , डॉ. विजय पाटील, डॉ. विनय पत्की, डॉ.अनिरुद्ध पत्की, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. कुलदीप भांबूरे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. अशा या सुसंस्कृत, विज्ञान निष्ठ डॉ. बापट यांच्या कार्य व कर्तुत्वास मानाचा सलाम .

 

विलास खरात
मो.नं.९२८४०७३२७७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *