लोकदर्शन आटपाडी 👉 राहुल खरात
आटपाडी दि . १४ एप्रिल.२०२३
*कराड – विटा – आटपाडी मार्गे गुहागर – पंढरपूर* हा आणि *बारामती – आटपाडी – विजयपूर ( विजापूर )* हा नवा रेल्वे मार्ग असे दोन नवे रेल्वे मार्ग अस्तित्वात आणत शतकापासूनचे आटपाडीचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करा,असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक आटपाडी यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री . शरदचंद्रजी पवार यांच्याकडे केली आहे .
खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील, खासदार श्रीनिवास पाटील सातारा , खासदार सुप्रियाताई सुळे बारामती, खासदार अमोल कोल्हे शिरूर , खासदार सुनिल तटकरे रायगड , खासदार फौजिया खान परभणी, खासदार महंमद फैजल लक्षद्वीप यांना पाठविलेल्या ईमेलद्वारे या अत्यंत महत्वाच्या मागणीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे .
माणदेशी आटपाडी, खानापूर , माण, खटाव या तालुक्यातील हजारो बांधव गलाई व्यवसायाच्या निमित्ताने भारतातील सर्व राज्ये, सर्व शहरांमध्ये विखुरलेले आहेत . शेजारच्या काही राष्ट्रातही या व्यवसायासाठी शेकडो माणदेशी बांधव कार्यरत आहेत . मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये हमालीसाठी, सुरत, मुंबई, अहमदाबाद, इचलकरंजी इत्यादी शहरांमध्ये कापड व्यवसायात असणाऱ्या माणदेशीची संख्या मोठी आहे . माणदेशी डाळींब, बोर, द्राक्षे ही जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवू लागली आहेत . उत्कृष्ट चवीच्या, सर्वोतम दर्जाच्या, निरोगी, चपळ, शेळ्या, मेंढ्या , बोकडे , बकऱ्यांच्या मांसाने महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, कोल्हापूर , सातारा, सोलापूर , उस्मानाबाद कर्नाटकातील विजयपूर, ( विजापूर ) हुबळी, बेंगलोर, मेंगलोर, चित्रदुर्ग, शिमोगा, बेळगांव, आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांसह तेलंगणातील हैद्राबाद इत्यादी ठिकाणच्या मटन खवय्यांना भुरळ पाडली आहे . टेंभूच्या माध्यमातून कृष्णामाई माणदेशाच्या अंगणी अवतरल्याने इथला निकोप, सकस, दर्जेदार आणि चविष्ट धान्य , कडधान्ये भाजीपाला उत्पादनाला गती येणार आहे . जातीवंत, देखणे, कष्टाळू, चिवट ,खिलार जनावरे तर माणदेशाचे वैभव आहेत. शेतीसाठी, दुध दुभत्यासाठी इथल्या खिलार जनावरांनी भारतभर नाव कमावले आहे . खिलार गाय, खिलार खोंड, खिलार बैला बरोबरच देशी म्हैशींच्या संगोपनात कृष्णेच्या पाण्याने वाढच होवू लागली आहे . नोकरी आणि इतर व्यवसायाच्या निमित्ताने हजारो माणदेशींनी काही राज्ये व्यापली आहेत . आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ विजयपूर (विजापूर ) येथे साकारले जात असल्याने विजापूरला जाणाऱ्या रेल्वे मार्गाचा मोठा फायदा माणदेशातील विविध व्यवसायांना होणार आहे आणि शक्य तितक्या लवकर आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत एक्सपोर्ट क्वालीटीचा माल पाठविता येणार आहे . या सर्वांच्या सोयीसाठी, प्रवाशी वाहतूक, माल वाहतूकीसाठी परवडणारी, देशभरात कुठेही उपलब्ध होणारी, जाणारी *रेल्वे वाहतूकीची सोय* या माणदेशाचे शतका पासूनचे स्वप्न आहे .
महाराष्ट्र वाल्मीकी ग.दि. माडगूळकर यांच्या स्वप्नातल्या *झुक झुक आगीनगाडी* ने तीन पिढ्यांना वेड लावले आहे . गदिमांच्या खप्नातल्या मामांच्या गावी ( भारत भर ) जाण्यासाठी आटपाडी मार्गे ये – जा करणारी रेल्वे वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणे लाखो माणदेशीसाठी सोयीचे, फायद्याचे असल्याने गदिमांच्या गीतातले मामा तुम्ही बनत , आटपाडीतून जाव्यात अशा दोन नवीन रेल्वे मार्गासाठी आपण यशस्वी प्रयत्न करावेत आणि गदिमांच्या स्वप्नाला सत्यात उतरावावे .
१ ) कराड – विटा -आटपाडी मार्गे जाणारा गुहागर – पंढरपूर हा नवा रेल्वे मार्ग अस्तित्वात आणावा . तसेच
२ ) बारामती – विजयपूर ( विजापूर ) आटपाडी मार्गे जा – ए करणारा आणखी एक नवा मार्ग असे दोन रेल्वे मार्ग आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून सत्यात आणावेत . या दोन्ही रेल्वे मार्गाच्या माध्यमातून माणदेशी रेल्वेसाठी आपणच, माजी रेल्वेमंत्री स्व . मधु दंडवते, माजी मंत्री स्व .जॉर्ज फर्नाडिस या लढवय्या नेत्यांसारखी भूमिका पार पाडावी . आपणा सर्वांमुळे ( कै .जॉर्ज फर्नांडीस साहेब, कै .मधू दंडवते साहेब, श्री . पवार साहेब . ) कोकण रेल्वेचे अत्यंत अवघड, खडतर, अभूतपूर्व, प्रचंड खर्चाचे आणि अशक्यप्राय वाटणारे काम पुर्णत्वास जावू शकते . तर आटपाडी मार्गे मागणी असणाऱ्या दोन्ही रेल्वे मार्गासाठी फारसे यातायात करावेसे लागेल असे वाटत नाही . हे दोन्ही रेल्वे मार्ग आटपाडीच्या ज्या रेल्वे स्थानकातून जातील त्या रेल्वे स्थानकाला *ग .दि. माडगुळकर रेल्वे स्थानक असे नाव द्यावे .* अशी अपेक्षाही सादिक खाटीक यांनी शेवटी या ईमेलमध्ये केली आहे .
*___________________________*