कोणत्याही अडचणीशिवाय मिळावी आरोग्य सुविधा

by : Rajendra Mardane
: खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन

 

वरोरा  : “आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज असल्याने ती प्रत्येकाला कोणत्याही अडचणीशिवाय मिळायला हवी “, असे परखड प्रतिपादन चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी येथे केले. ” सगळ्यांसाठी आरोग्य ” ही जागतिक आरोग्य दिनानिमित्त सन २०२३ ची थीम असल्याने दिनांक ७ ते १४ एप्रिल पर्यंत येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ‘ सुंदर माझा दवाखाना ‘ ही मोहिम राबविण्यात येत आहे. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आर. एम. ओ. डॉ. हेमचंद कन्नाके , वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, सहाय्यक अधिसेविका वंदना बरडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
खासदार धानोरकर पुढे म्हणाले की, दरवर्षी जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरुकता वाढविण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. प्रत्येक आजाराशी लढण्यासाठी माणसाला पुरेशा उपचार सुविधा असायला हव्यात. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात बहुतांश आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यात येत असल्याने आजूबाजूच्या ३ जिल्ह्यातील नागरिक इथे उपचारासाठी येतात. वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांनी रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. परिसरातील जनतेने वैद्यकीय अधिकारी,अधिसेविका व आरोग्य विभागाद्वारे मिळणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच सर्वांसाठी आरोग्याचा मार्ग सुकर होईल, असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे कोरोना सारख्या नवीन महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आणि लाखों लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आता पुन्हा कोरोना सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना आजारासंबधी ‘ मास्क ‘ चा वापर, सोशल डिस्टंसिंग, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वेळीच तपासणी व उपचार आदी बाबत नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, वरोरा उपजिल्हा रुग्णालयातर्फे शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत ४०० हून अधिक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यांनी सुंदर माझा दवाखाना अंतर्गत करावयाच्या कृती तथा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करून सप्ताहाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र शासनाच्या ‘ सुंदर माझा दवाखाना ‘ मोहिमेचे जिल्हा स्तरावरील उद्घाटन खा. धानोरकर यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाले. यावेळी खा. धानोरकर व डॉ. चिंचोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जागतिक आरोग्य सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद कुंभारे यांनी केले. आभार आरोग्य सहाय्यक एस.एन. येडे यांनी मानले.
कार्यक्रमात रुग्णालय प्रतिनिधी, अधिसेविका, रुग्णालयातील कर्मचारीगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#balubhaudhanorkar

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *