by : Shankar Tadas
कोरपना : बँक ऑफ इंडियाच्या वनसडी शाखेमध्ये खातेधारकांना योग्य प्रकारे सेवा मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या बँकेत नेहमीच गर्दी असते. लहानमोठ्या कामासाठी येथे तासंतास उभे राहावे लागते. बँकेत बसण्याचीसुद्धा पुरेशी व्यवस्था नाही. बँकेबाहेर सुद्धा बसण्यास नीट जागा नाही. पासबुक प्रिंटर नेहमीच बंद असते. अशा प्रकारच्या विविध तक्रारी खातेधारक नेहमीच करत असतात. मात्र त्याची दखल घ्यायला येथे कोणीही तयार नसतो. शाखा व्यवस्थापक यांना सांगितले तर वरिष्ठांकडेच माहिती पाठवतो एवढेच एक उत्तर मिळत असते. बँकेच्या इतर शाखांमध्ये सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळताना आपण पाहतो. वनसडी शाखेत इतका भोंगळ कारभार का चालतो याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. ही बँक किरायाच्या अपुऱ्या जागेत असून नेहमी दाटीवाटीने खातेधारकांना उभे राहावे लागते. खातेदारांची संख्या पाहता बँकेला योग्य इमारत असणे गरजेचे आहे. या शाखेत शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात खातेधारक असून त्यांना आपली शेतीची कामे थांबवून या बँकेत चकरा माराव्या लागतात. याचा भुर्दंड हजारो ग्राहकांना बसत असला खातेदारांची समस्या गांभीर्याने घेतली जात नाही. या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांनी काँग्रेसचे कोरपना तालुकाध्यक्ष उत्तमरावजी पेचे यांची भेट घेऊन समस्या सांगितली. त्यांनी सदर समस्या त्वरित दूर करण्याचे निवेदन बँकेचे शाखा व्यवस्थापक यांना पक्षाच्या वतीने दिले. यावेळी प्राध्यापक साईनाथ कुंभारे यांनी बँक व्यवस्थापक यांना खातेधारकांच्या विविध अडचणी सांगितल्या.
#biowansadikorpana