लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि ३.आगामी २०२४ च्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने संपूर्ण देशात पदाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले असून त्याचे आदेश राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी देखील अंमलात आणण्यास सुरूवात केली आहे.अनेक नविन तरूणांना राज्यात काम करण्याची संधी नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून मिळण्यास सुरूवात झाली आहे तर अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली.
पक्ष मुख्यालय टिळक भवन,मुंबई मध्ये पार पडलेल्या विभाग व सेलच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी प्रदेश संघटक शंभो म्हात्रे यांना बढती देत कोकण विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती केली त्याचे पत्र नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते देण्यात आले.शंभो म्हात्रे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यांच्या निष्ठेची व कामाची दखल घेऊनच कोकणात काँग्रेस मजबुत करण्यासाठी म्हात्रेंवर ही जबाबदारी दिल्याचे भानुदास माळी यांनी सांगितले. तर नानाभाऊ पटोले यांनी म्हात्रे यांचे अभिनंदन करून ओबीसींच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत कराल अशा शुभेच्छा म्हात्रे यांना दिल्या.पक्षाने माझ्यावर ईतकी मोठी जबाबदारी दिली आहे ती पक्षहितासाठी आपल्या सर्व वरिष्ठांच्या आशिर्वादाने,मार्गदर्शनाने व सहकार्याने पार पाडेल अशी ग्वाही शंभु म्हात्रे यांनी दिली.शंभो म्हात्रे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून ते नक्कीच कोकणात काँग्रेसला अच्छे दिन आणतील असे बोलले जात आहे