लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – शासन शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या धोरणांची अंमलबजावणी करीत असून शासनाची अनेक धोरणे निराशाजनक आहे. शैक्षणिक क्षेत्रात कंत्राटी शिक्षकांची भरती करून शासन खाजगीकरण करीत आहे. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असून यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शासनाच्या अशा धोरणांमुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंता निर्माण झाल्याचे प्रतिपादन नागपूर शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार व निरोप समारंभ नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी संस्थेच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला. तर सेवानिवृत्तीबद्दल प्रा. अशोक डोईफोडे यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे परीक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताडे, संस्थेचे उपाध्यक्ष राहुल बोढे, विमाशीचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, संस्थेचे संचालक विठ्ठल थिपे, विकास भोजेकर रामचंद्र सोनपितरे, संचालिका उज्वला धोटे, माजी जि. प. सदस्य अरुण निमजे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, सेवानिवृत्त प्रा. अशोक डोईफोडे, प्रभाताई डोईफोडे, प्राचार्या स्मिता चिताडे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या स्मिता चिताडे यांनी केले. संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले तर आभार प्रशांत धाबेकर यांनी मानले.