लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्य़ातील शेतकरी आपल्या ऐन शेतपिकांच्या काढण्यात व्यस्त असतांनाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान शेतकरी बांधवांना सहन करावे लागत आहे. या अवकाळी पावसाने राजुरा तालुक्यांसह क्षेत्रातील अनेक गावांमध्ये अचानक धुमाकूळ घातला. यात अनेक शेतकऱ्यांचे, नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे तरी या सर्व नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शनिवार, रविवार ला अवकाळी पावसाने राजुरा, कोरपना, व क्षेत्रातील अनेक गावांमध्ये कहर केला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. गहू, हरभरा, ज्वारी अशी रब्बी पिके जमीनदोस्त झाली. शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी घरांचे छते कोसळल्याच्या तर अन्य काही नुकसान झाल्याच्या घटना आहेत. कोरपना तालुक्यातील अंतरगाव प्राथमिक शाळेचे छत कोसळले. सुदैवाने घटनेच्या वेळी शाळेत विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली. या सर्व नुकसानीचे पंचनामे संबंध अधिकाऱ्यांनी तातडीने करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, नागरिकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच सरकारनेही अविलंब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मदत करावी अशी मागणी केली आहे.