शरद पवार महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस संपन्न ————————— ♦️उत्तम भाषिक कौशल्ये जोपासणारा समाजच प्रगतीपथावर वाटचाल करतो – बंडोपंत बोढेकर

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 (प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भाषा ही मानवी जीवनात संवादाचे प्रभावी माध्यम असून ती विचार ,भावना आणि सांस्कृतिक आचार यास सुव्यवस्थित करणारी प्रक्रिया आहे .सहजता, सुलभता आणि अर्थपूर्ण व्यावहारिक संपन्नता आपल्या मातृभाषेतच प्राप्त करता येते. त्यामुळे भाषिक कौशल्ये आपल्याला लवकर आत्मसात करता येतात. उत्तम भाषिक कौशल्ये जोपासणारा समाजच आजच्या काळात उत्तम मानवी संबंध प्रस्थापित करून प्रगतीचे शिखर गाठू शकतो , असे प्रतिपादन साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी गडचांदूर येथे केले.
शरद पवार महाविद्यालय गडचांदूरच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह होते. तर ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. हेमचंद दुधगवळी, डॉ. सुनील बिडवाईक, सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे , डॉ. राजेश गायधनी, डॉ. शरद बेलोरकर , डॉ. सत्येंद्रसिंह आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रा. हेमचंद दुधगवळी यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
आपली भाषा शिकणे, इतरांनाही शिकवणे आणि आपल्या भाषेला जगवण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे याप्रसंगी प्राचार्य डॉ. सिंह यांनी व्यक्त केले.
सामाजिक तथा साहित्य सेवेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. प्रा. हेमचंद दुधगवळी यांचा झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समितीच्या वतीने मानवस्त्र व ग्रंथ भेट देऊन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उज्वला जानवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी केले. कार्यक्रमास शिक्षकेत्तर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *