सर्वाधिक कमिशन मिळणारी महाराष्ट्र राज्याची पेपर लॉटरी बाजारातून बेपत्ता!*
लोकदर्शन मुंबई -👉 (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
अधिकृत व शासनमान्य असलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या विक्रीतून विक्रेत्यांना सर्वाधिक कमिशन मिळते खरे पण हीच लॉटरी ‘शासकीय’ असुनही ‘बेपत्ता’ आहे! त्याची जागा आज दुर्दैवाने खाजगी, अन्य पेपर लॉटरीने घेतली आहे, तेव्हा उठा जागे व्हा आणि सरकारला जाब विचारूया ‘असे कळकळीचे आवाहन लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते श्री विलास सातार्डेकर यांनी ग्राहक, विक्रेते’, वितरक यांना केले आहे.
महाराष्ट्र शासनाची गुढीपाडवा भव्यतम लॉटरीची विक्री सर्वाधिक विक्रमी होण्यासाठी आयोजित केलेल्या एका मेळाव्यात सातार्डेकर विक्रेत्यांना मार्गदर्शन करीत होते. देशभरात एकमेव विश्वासार्ह म्हणुन ओळख असणाऱ्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या अर्थ चक्रावर सरकारने आज दुर्लक्षच केले आहे. अनेक महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे ‘सरकारी ‘असुनही लॉटरीचा खप हा दिवसेंदिवस घसरत चालला आहे, हे आकडेवारीच्या आधारे सातार्डेकर यांनी स्पष्ट केले. वेळीच एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करुन एकूणच लॉटरी क्षेत्रात बदलत्या काळात आमुलाग्र बदल न केल्यास कोणे एके काळी महाराष्ट्रात! लॉटरी जिवंत होती! असे म्हणावे लागेल, असेही सातार्डेकर यांनी सांगितले.