लोकदर्शन आटपाडी👉.राहुल खरात
दि . २३ निंबवडे ग्रामपंचायतीच्या उच्च विद्याविभूषीत सरपंच नंदाताई देठे आणि त्यांचे सर्व उच्च विद्याविभुषीत ग्रामपंचायत उपसरपंच – सदस्य – सहकारी यांनी विधवां सन्मानाच्या निमित्ताने सर्व माता भगिनींचा हळदी कुंकु समारंभ संपन्न करत क्रांतीकारी पाउले टाकले आहे .
खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या धर्मपत्नी आणि आटपाडी तालुक्यातील आधुनिकतेचा नेहमीच पुरस्कार – समर्थन करणाऱ्या सर्वात शक्तीशाली, प्रभावी महिला नेत्या सौ . सुवर्णादेवी देशमुख यांनी या महत्वपूर्ण उपक्रमात सहभागी होत नव क्रांतीच्या – विधवा सन्मानाच्या एल्गाराचे ठाम समर्थन केले . नियतीच्या आघातातून विधवा बनलेल्या प्रत्येक माय भगिनीला सन्मानाने जवळ करणे, त्यांना सहकार्य करणे, त्यांच्या दुःखावर फुंकर घालणे, त्यांच्या प्रगतीला हातभार लावणे, त्यांना सवाष्ण माता भगिनींच्या भावनेतून पाहणे, त्यांच्या सारखेच सर्वत्र सन्मानाने वागवणे ही काळाची गरज आहे . तीस वर्षापासून विद्याताई बोराडे यांनी आटपाडी तालुक्यात सुरु केलेल्या विधवा सन्मानाच्या चळवळीला मोठे यश येत असून शासन स्तरावरून ही विधवा सन्मानाच्या दृष्टीने पावले टाकलीत जात आहे . हे सर्व माता भगिनींच्या दुष्टीने भुषणावह आहे . असे मत उपस्थित मान्यवर महिला नेत्यांनी व्यक्त केले .
निंबवडे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने विविध उपक्रमाच्या माध्यमातून निंबवडे येथे मोठी प्रबोधनाची चळवळ उभी केली गेली आहे . या प्रबोधन चळवळीचा आणि निंबवडे ग्रामपंचायतीच्या उच्च शिक्षित नेतृत्वाच्या विधायक वाटचालीचा परिणामच आजच्या हळदी कुंक समारंभात, सवाष्ण महिलांनी विधवांचा आणि विधवा भगिनींनी सवाष्ण भगिनींचा हळदी कुंकू लावत सन्मान करीत आनंद साजरा करणे हा असल्याचा दिसून आला.
निंबवडे च्या सरपंच नंदाताई देठे, रिद्धी सिद्धी संस्थेच्या संस्थापिका सुरेखा काळेल, आटपाडीच्या प्रा . डॉ . सुजाता देशमुख, ग्रामसेवक श्री . संजय कर्णे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व निंबवडे पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .