लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून राजुरा कल्ब राजुरा द्वारा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुराच्या पटांगणावर आयोजित तीन दिवसीय विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डीचे उद्घाटन शानदार सोहळ्यात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उद्घाटक वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक एस. एस. डे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, दगडी चाळ फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पुजा सावंत, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू अनिल माडवे, ग्रा. स. शि. प्र. मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष तथा बामणीचे उपसरपंच सुभाष ताजने, सेवा कलस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे, चंद्रपूर जिल्हा कबड्डी महासंघाचे पदाधिकारी सुभाष गौर, दिलीप रामेडवार, सतीश डफले, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष संदीप जैन यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, कबड्डी सारख्या मैदानी खेळातून युवकांना प्रगतीच्या संधी आहेत. प्रो कबड्डी सारख्या स्पर्धांतून अनेक कुशल, अष्टपैलू खेळाडूंनी प्रगती साधली आहे. अनेकांनी शासकीय नोकरीत स्थान मिळविले आहे. या विदर्भ स्तरीय आमदार चषक कबड्डी च्या माध्यमातून क्षेत्रातील युवा वर्ग कबड्डीचे कौशल्य आत्मसात करतील, मैदानी खेळाकडे वळतील अशी मला खात्री आहे. तर अभिनेत्री पुजा सावंत यांनी उद्घाटनपर मार्गदर्शनात सांगितले की आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या विकास कार्याचे आणि त्यांच्या नेतृत्वाचे गुणगौरव संबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. विदर्भ स्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. राजुरा वाशीयांच्या अप्रतिम स्वागताबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार मानले.
या प्रसंगी बहारदार नृत्य सादर करण्यात आले. पुरुष गटाचे दोन व महिला गटाचे दोन कबड्डी सामने घेण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा कलस फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे यांनी केले. संचालन व रआभार प्रदर्शन प्रलय मशाखेत्री, शृती मोहितकर यांनी केले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.