लोकदर्शन 👉 – मोहन भारती
राजुरा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्याची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व शिवाजी विद्यालयाच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमात राजुरा, कोरपना व जिवती येथील पाच गणमान्य पत्रकारांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे होते. प्रमुख अतिथी शेतकरी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश जाधव, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप जैन, डॉ.उमाकांत धोटे, मुख्याध्यापक प्रभाकर बोभाटे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते महियार गुंडेविया स्मृति ज्येष्ठ पत्रकार जीवन गौरव पुरस्कार गडचांदुर येथील उपप्राचार्य विजय आकनुरवार यांना प्रदान करण्यात आला. प्रभाकरराव मामुलकर स्मृती उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कार पुण्यनगरीचे जीवती तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण, राघवेंद्रराव देशकर ग्रामीण वार्ता पुरस्कार दैनिक चंद्रपूर समाचारचे तालुका प्रतिनिधी वामन पुरटकर, सुरेंद्र डोहे स्मृती पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकमतचे कोरपणा प्रतिनिधी जयंत जेनेकर आणि शंकरराव देशमुख मीडिया वार्तांकन पुरस्कार आकाशवाणीचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मंगेश बेले यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
सोहळ्यात आपले विचार व्यक्त करतांना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, पूर्वीची मुल्याधिष्ठीत पत्रकारिता आणि आताची मीडिया ट्रायल पत्रकारिता यात मोठा फरक आहे. पूर्वी कितीही विरोधात लिखाण केले तरी पत्रकारांना कुणी दूषणे देत नसत मात्र, आता त्यावर त्वरित प्रतिक्रिया तर येतेच शिवाय ही प्रतिक्रिया कधी हिंसकही होते. मात्र पत्रकारांनी सत्य बाजू नेहमी जनतेसमोर ठेवावी आणि चौथ्या स्तंभाचे कार्य प्रामाणिकपणे सुरू राहावे, असे मत व्यक्त केले. माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी वृत्तपत्रांनी निर्भिडपणे आपले कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले.
माजी आमदार ॲड. वामनराव चटप म्हणाले की, पत्रकारांनी बदलत्या परिस्थितीत सत्याची कास न सोडता आपले कार्य तेवढ्याच नेटाने करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या लिखाणातून आमूलाग्र परिवर्तन व्हावे, यासाठी लिखाण करण्याची पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे आणि सत्यनिष्ठ पत्रकारांसोबत संपूर्ण समाज पाठीशी असल्याचे मत ॲड. चटप यांनी व्यक्त केले. माजी आमदार ॲड. संजय धोटे म्हणाले की, समाजाची उन्नती होण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र पत्रकारांनी न्यायाधीशाच्या भूमिकेतून व्यक्त न होता दोन्ही बाजूंना समान दृष्टीकोनातून बघण्याची गरज असल्याचे मत मांडले. प्रास्ताविक डॉ. उमाकांत धोटे, संचालन बादल बेले व आभार प्रदर्शन बी.यू.बोर्डेवार यांनी केले.
या सोहळ्याला व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष बंडू माणूसमारे, माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, व्यापारी संघाचे सचिव संतोष रामगिरीवार, डॉ.सत्यपाल कातकर, पुंडलिक उराडे, मिलिंद गड्डमवार, बापूराव मडावी, रत्नाकर चटप, भास्कर येसेकर, मधुकर जाणवे, रामचंद्र मुसळे, भोयर, नंदकिशोर वाढई, शरद बेलोरकर, मंगल जीवने, महादेव तपासे, जयश्री देशपांडे, कृतिका सोनटक्के, अरुण जमदाडे, जनार्दन निकोडे, शहजाद अली, प्रकाश फुटाणे, सुनील रामटेके, पत्रकार संघाचे सचिव अनिल बाळसराफ, प्रवीण देशकर, गणेश बेले, विनायक देशमुख, एम.के.सेलोटे, रंगराव कुळसंगे, बाबा बेग, सुरेश साळवे, मसूद अहमद, आनंद भेंडे, मिलिंद देशकर, नितीन मुसळे इत्यादी सह मोठ्या संख्येने पत्रकार, नागरिक, महिला आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.