By : Shankar Tadas
चंद्रपूर :
सावली तालुक्यातील मेहा बुजरूक येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू सुरू आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून, गावात वादविवादाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याला आळा घालण्यासाठी गावातील महिलांनी एकत्रित येऊन दारूबंदी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. आज दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून गावातील सरपंच रुपेश रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी गावात संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय गावातील इतर अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात आली. गावात कोणत्याही छोट्या-मोठ्या कार्यक्रम आयोजित केला तरी तरुण पिढी दारू पिऊन कार्यक्रमामध्ये व्यक्ती आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सोळा वर्षाच्या मुलापासून दारूचे व्यसन लागले असून, सामाजिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिघडू लागले आहे. त्यामुळे दारू बंदी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सर्वांमध्ये सुनंदा भोयर यांची दारूबंदी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीला गावातील महिला पुरुषाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#mehawomens