By : Rajendra Mardane
चंद्रपूर :
कापसाला मागील वर्षी मिळालेला उत्तम दर यंदा मिळण्याची धूसर शक्यता लक्षात घेता थेट आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस विक्रीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
तालुका कृषि अधिकारी, वरोरा अंतर्गत काही गावांमध्ये महाकॉट योजनेअंतर्गत ‘एक गाव एक वाण’ लागवड करून एकजिनसी कापूस उत्पादित करण्यात आला. या उत्कृष्ट प्रतीच्या कापसाच्या गाठी वरोरा येथील पारस जिनिंगच्या सहयोगाने तयार करून शेतकरी स्वतः गटामार्फत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरणार आहे.
27 डिसेंबर 2022 रोजी महाकॉट अंतर्गत कोंढाळा येथील शेतकरी गटांचा कापूस पारस जिनिंग वरोरा येथे प्रोसेसिंग करिता आणण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे स्मार्टचे नोडल अधिकारी नंदकुमार घोडमारे , तसेच चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा, गजानन भोयर तालुका कृषी अधिकारी वरोरा, कु. प्रगती चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी, टेंभुर्डा; मा. मारोती वरभे कृषी अधिकारी वरोरा; भोम्बे ग्रेडर; पारस जिनिंग चे अमोल मुथा; किशोर डोंगरकर व पांडुरंग लोखंडे कृषी पर्यवेक्षक टेंभुर्डा, मिनल असेकर, बीटीएम आत्मा वरोरा व गट प्रवर्तक भानूदासजी बोधाने यांचेसह कृषि क्रांती शेतकरी गट, कोंढाळा चे सर्व सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
या कापसावर प्रक्रिया, जिनिंग, प्रेसिंग करून त्याच्या गाठी तयार करण्यात येतील व या उत्पादित गाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर कृषिक्रांती गटाचे नावाने आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीकरिता ठेवण्यात येणार आहे. स्वतःच्या कापसाचे मूल्यवर्धन करून आंतरराष्ट्रीय बाजारात उतरून विक्री करण्याची संधी महाकॉट या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे.
तालुका कृषि अधिकारी वरोरा यांनी राबविलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना उत्कृष्ठ प्रतीचा कापूस उत्पादित करून स्वतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याची संधी प्राप्त होत आहे. आता शेतकरी व्यापाऱ्यांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरून अधिक नफा कमावतील व जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे, असे मत गट प्रवर्तक भानुदास बोधाने यांनी व्यक्त केले.