लोकदर्शन 👉(गुरुनाथ तिरपणकर)-”
———————————–
“भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती, भारतीय संस्कृती म्हणजे विशालता, भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग. अशी जी थोर संस्कृती त्याचा लहानसा निदान मानसिक तरी उपासक होण्याचे भाग्य मला जन्मोजन्मी लागू दे ”
अशी तळमळीनं प्रार्थना करत सातत्याने झटणारे साने गुरुजी.
या थोर भारतीय संस्कृतीच्या उपासकाचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील पालगड या गावी झाला. पालगड येथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर दापोलीच्या मिशनरी शाळेमध्ये संस्कृत आणि मराठी भाषेवरील प्राविण्यामुळे तसेच त्याच्या कविता रचण्याचा छंदामुळे पांडुरंग सदाशिव साने हा विद्यार्थी लोकप्रिय झाला .
डाळ चुरमुरे खाऊन तर कधी एकवेळ जेवून गुरुजी पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षण घेऊन १९२८ साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुण्यातील एस. पी. कॉलेज मधून गुरुजींनी बी.ए. व एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले . अंमळनेर येथे वसतिगृहाचे प्रमुख म्हणून कार्य करीत असताना ते विद्यार्थी जीवनाशी समरस झाले. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे म्हणत ते विद्यार्थी जीवनाशी एकरूप झाले. समरस झाले. नोव्हेंबर १९२८ मध्ये त्यांनी ” विद्यार्थी” हे मासिक सुरू केले.१९३० साली महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहात सहभागी झाल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली.१९३२ ते १९३४ पर्यंत तुरुंगात असताना त्यांचा आचार्य विनोबा भावे यांच्याशी परिचय झाला.
१९३८ साली साने गुरुजींनी ” काँग्रेस” नावाचे साप्ताहिक सुरू केले.१९४० ते १९४२ मध्ये त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता . सुटकेनंतर गुरुजी नेटाने सत्याग्रह चळवळ चालवित होते.१९४३ ते १९४५ या कालावधीत त्यांना पुण्यातील येरवडा येथील कारागृहात बंदिस्त करण्यात आले.१९४५ साली देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस व मुस्लिम लीग हे दोन पक्ष प्रबळ ठरले. स्वातंत्र्याचा उष: काल उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना देशातील जातीयवाद, धर्मांधता उफाळून यावी या गोष्टीचे गुरुजींना वैषम्य वाटत असे.
पंढरपूरचे मंदिर हरिजनाना खुले करण्यात यावे म्हणून गुरुजींनी सतत सहा महिने आपल्या ओजस्वी वाणीने महाराष्ट्र भर जनजागृति करून व अखेरचा उपाय म्हणून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारून हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यात अखेरीस यश मिळविले. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींच्या हत्येस एक महाराष्ट्रीयन जबाबदार आहे या जाणिवेने पापक्षालनार्थ गुरुजींनी एकवीस दिवसाचे उपोषण केले.
गुरुजींची राजकीय मते समाजवादी असल्याने त्यांनी १५ ऑगस्ट १८४८ रोजी ” साधना” नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यातून आपले समाजवादी विचार मांडण्यास सुरुवात केली. कादंबऱ्या, वैचारिक लेख , काव्य, चरित्रे, नाट्य संवाद इत्यादी साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. या विपुल साहित्यातील तेजस्वी रत्न म्हणजे ” श्यामची आई”. या पुस्तकातील बेचाळीस रात्रींतील छत्तीस रात्रीचं लिखाण नाशिक च्या कारागृहात झाले होते. बाहेर आल्यावर सहा रात्रींचे लिखाण झालं.गुरुवार दिनांक ९ जानेवारी १९३३ रोजी लिखाणास प्रारंभ करून सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी गुरुजींनी आपले तुरुंगातील लिखाण संपविले. “श्यामची आई”या पुस्तकाची देश विदेशातील अनेक भाषांमधून भाषांतरे झाली आहेत.” श्यामची आई ” वर प्रतिक्रिया व्यक्त करताना आचार्य अत्रे म्हणतात ,
” मानवी जीवनातल्या सर्व सद्गुणांची, सौंदर्याची, अन् मांगल्याची जणू काही धार काढूनच ती त्या चांदीच्या कासेंडीत भरून गुरुजींनी तरुण पिढीच्या हातात दिली आहे. या दृष्टीने ” श्यामची आई ” ही भारतातल्या मुलाबाळांची आणि तरुणांची ‘ अमर गीताई ‘ आहे असं म्हटलं पाहिजे ”
रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन प्रमाणेच संकुचित प्रांतीयता व भाषिक वाद दूर करण्यासाठी गुरुजींची ‘ आंतर भारती’ या नावाची संस्था स्थापन करण्याची त्यांची संकल्पना मात्र प्रत्यक्षात साकार होऊ शकली नाही.
आपल्या कृतीतून, उक्तीतून आणि लेखणीतून त्याग, संयम, वैराग्य, प्रेम, ज्ञान, विवेक या चिरंतन मूल्यांचा संदेश देऊन व या सुंदर जगात मांगल्याची व मधुरतेची मौलिक भर टाकून साने गुरुजींनी ११ जून १९५० रोजी स्वेच्छेने या जगाचा निरोप घेतला. अखेरपर्यंत अविवाहित राहिलेल्या साने गुरुजींनी जगाच्या कल्याणासाठी ‘अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक’ म्हणत तळमळीने संसार केला.
साने गुरुजी म्हणतात,
” परमेश्वराचे स्वरूपच मुळी ज्ञान असे भारतीय संस्कृतीने सांगितले आहे. ईश्वराची उपासना करणे म्हणजे ज्ञानाची उपासना करणे. ज्ञानाची उपासना अनंत रूपांनी करणे. मग ते समाजशास्त्र असो की खगोलशास्त्र असो, इतिहास असो की गणित असो.
ज्यांच्याजवळ त्याग असेल त्यांच्या जवळ धर्माचा आत्मा आहे. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे.
सद्गुरु श्री. वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन चे घोष वाक्य ” प्रत्येक कृती राष्ट्रहिताची, प्रत्येक कृती विश्व शांतीची ” ध्यानात घेऊन आचरण केल्यास साने गुरुजींचे स्वप्न ” बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो I “नजीकच्या भविष्यात नक्कीच साकार होईल.
प्रा. सुहास पटवर्धन ९८९०५६९१०६