लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर/यवतमाळ:- माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारा चंद्रपुरातील सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथी केंद्राचे लोकार्पण पार पडले हा या केंद्रातील संशोधकांसाठीच नव्हे तर चंद्रपूरसह वैदर्भिय जनतेसाठी आनंदाचा क्षण असून या आनंदात सहभागी होण्यासाठी आल्याचे सांगत हे संस्थान चंद्रपूरसह विदर्भातील गोरगरीब, आदिवासी सिकलसेल व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना नवजीवन देणारे ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
दि. 11 डिसेंबर रोजी आयसीएमआर-एनआयआयएच. मुंबईद्वारा लोकार्पण उपरांत संस्थेमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास डॉ. एन. के. मेहरा, हेड ऑ डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सप्लांट इम्युनोलॉजी ॲन्ड इम्युनोजेनिटिक्स. डॉ. दिपीका मोहंती, डॉ. तंजक्शा घोष, डॉ. रोशन कोलाह, डॉ. मनिषा मडकईकर, संचालक, आयसीएमआर, मुंबई. डॉ. मलाय मुखर्जी, डॉ. एम.जे. खान, डॉ. रुगवाणी, कार्यकारी अभियंता सा.बां.वि. श्री. भास्करवार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना हंसराज अहीर यांनी आयसीएमआर हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, प्रबंधन व नियंत्रण केंद्राच्या चंद्रपूर येथील स्थापनेविषयी सांगतांना थॅलेसेमिया सोसायटीच्या माध्यमातून मिळालेल्या सहकार्याबद्दल डॉ. व्ही.पी. चौधरी, डॉ. एम. के. मेहरा व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. सन 2005 मध्ये चंद्रपूरात आयोजित केलेल्या सिकलसेल शिबीराचा विशेष उल्लेख करून हंसराज अहीर यांनी चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातील सिकलसेलग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेवून या केंद्राच्या चंद्रपुरात उभारणीसाठी सर्वांच्या सहकार्यातून यश मिळाल्याचे सांगत युपीए सरकारच्या काळात या केंद्राला मान्यता मिळाली होती. परंतू निधी अभावी या केंद्राचे कार्य संथ गतीने सुरु होते. प्रधानमंत्री मोदीजींच्या पुढाकार व सहकार्याने या केंद्राच्या उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध झाल्यामुळे या केंद्रास सर्व सोईंनीयुक्त इमारतीचे निर्माण कार्य पूर्ण झाल्याने आज हे केंद्र चंद्रपुरात स्थापित होवू शकले याचा आनंद व अभिमान असल्याचे अहीर म्हणाले.
सन 2019 मध्ये पंतप्रधान नरेद्र मोदीजींनी यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा येथून या हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, प्रबंधन व नियंत्रण केंद्राची ऑनलाईन आधारशिला स्थापित केली होती व त्यांच्या पुढाकारातून, सहाकार्यातुन कार्यान्वित चंद्रपूरातील हे पहिले केंद्र त्यांच्याच शुभहस्ते रुग्णांच्या सेवेत रूजू झाले ही फार मोठी उपलब्धी असल्याचे अहीर यांनी याप्रसंगी सांगितले. या केंद्राच्या उभारणीत काहीसा विलंब झाला असला तरी संशोधकांमधील उत्साह व इच्छाशक्तीच्या बळामुळे हे केंद्र देशातील रक्तविषयक संशोधनात अग्रेसर ठरेल असा विश्वास सुध्दा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. या कार्यामध्ये ज्या ज्या मान्यवरांचे अनमोल सहकार्य लाभले त्या सर्वांचे हंसराज अहीर यांनी भाषणातून आभार मानले.
याप्रसंगी बोलतांना एम्सचे पूर्व अधिष्ठाता डॉ. एन. के. मेहरा यांनी चंद्रपुरात हे सॅटेलाईट सेंटर स्थापित करण्यासाठी हंसराज अहीर यांनी घेतलेल्या परिश्रमाची मुक्तकंठाने प्रसंशा करीत राजकीय क्षेत्रात कार्यरत लोकप्रतिनिधी रुग्णांच्या विशेषतः सिकलसेल, थॅलेसेमिया रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत प्रामाणिकपणे धडपड करतो ही आम्हासाठी आश्चर्याची बाब होती. त्यांच्या अविश्रांत परीश्रमातुनच हे केंद्र चंद्रपूरात साकार झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी या सेंटरद्वारा थॅलेसेमिया, सिकलसेलग्रस्त रुग्णांना तसेच रक्तसंबंधित संशोधनाला बळ देण्याचे प्रयत्न व्हावेत असे आवाहन केले. चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भात सिकलसेलग्रस्तांची फार मोठी संख्या असल्याने हे सेंटर या सर्वांना वरदान ठरावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन व पाहुन्यांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी आयसीएमआर-सीआरएमएचशी निगडीत आरोग्यविषयक माहितीपट दाखविण्यात आला. डॉ. मलाय मुखर्जी व श्री. पडवळ यांच्या व्दारा संपादित हिमोग्लोबिनोपॅथीज (1956 / 2021) डॉ. मलाय मुखर्जी, डॉ. रोशन कोलह, पल्लवी ठाकेर व नम्रता महाजन व्दारा संपादित अॅटलस ऑफ हिमोग्लोबिनोपॅथिस इन इंडीया, व डॉ. मनिशा मडकईकर, डॉ. स्वाती कुलकर्णी व डॉ. आनिंदिता बॅनर्जी व्दारा संपादित ‘अ ड्रॉप ऑफ होप : द जर्नि ऑफ 65 इअर्स’ या तीन आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन मान्यवर अतिथींच्या हस्ते पार पडले. आभार प्रदर्शनाने • कार्यक्रमाची सांगता झाली.