By : Shankar Tadas
चंद्रपूर :
*सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
* जिल्ह्याने पूर्ण केले 104 टक्के उद्दिष्ट
देशाच्या सीमा सुरक्षित तरच आपला देश आणि नागरिक सुरक्षित राहू शकतात. प्रतिकुल परिस्थितीतही ही सुरक्षा करण्याची महत्वाची जबाबदारी आपले सैनिक अहोरात्र करीत आहेत. त्यामुळे आपल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यांनी सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आपल्यापर्यंत पोहचवाव्यात. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.
जिल्हाधिका-यांच्या हस्ते पुढील वर्षीच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाची सुरूवात बुधवारपासून (7 डिसेंबर) करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे, वीज वितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सीमेचे रक्षण करणा-या सैनिकांमुळेच आपला देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शहीद सैनिक व माजी सैनिकांच्या परिवाराच्या कल्याणासाठी दरवर्षी सशस्त्र ध्वजदिन निधी संकलीत केला जातो. मागील वर्षी जिल्ह्याला 39 लक्ष 84 हजार ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट असतांना जिल्ह्याने त्यापेक्षा जास्त 41 लाख 50 हजार 358 इतका निधी (104 टक्के) संकलीत करून चांगली कामगिरी केली आहे. यात सर्व विभागांचे सहकार्य आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावर्षी देखील दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त ध्वजनिधी संकलीत केला जाईल, असे त्यांनी आश्वस्त केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, आपल्याला सुरक्षा देणारे सैनिक हे देशाची संपत्ती आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाची काळजी घेणे हे शासनासोबतच सर्व नागरिकांची देखील जबाबदारी आहे. तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी उद्याचे भावी सैनिक घडण्याची प्रेरणा मिळावी यासाठी सैनिकांचा त्याग व बलिदानाची माहिती लहान मुलांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. फक्त निधी गोळा करणे एवढाच उद्देश नाही तर या निमित्ताने शहिदांचे स्मरण आणि सैन्याप्रती भावना व्यक्त करणे, हा त्यामागील हेतु असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी प्रास्ताविकेतून ध्वजदिन निधी संकलनामागील इतिहास सांगतांना पहिल्या महायुद्धात मृत्यूमुखी सैनिक व जखमी सैनिकांच्या कुटूंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हापासून ध्वजदिन निधी संकलीत करण्यात येतो. दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. यानिमित्त सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाची सुरवात करण्यात येते.
या निधीतून युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या वारसांना आर्थिक मदत करणे, शहीद व सेवारत सैनिकांच्या परिवारांना मदत, सेवानिवृत्त सैनिकांचे पुनर्वसन, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, उच्च शिक्षणासाठी सैनिक वसतीगृह बांधण्यासाठी, अंत्यविधीसाठी मदत करणे, माजी सैनिकांच्या कुटूंबियांना चरितार्थ चालविण्यासाठी मदत या निधीतून करण्यात येत असल्याची माहिती कॅप्टन लिमसे यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी वेंकम्मा गोपाल भिमनपल्लीवार, वीरमाता पार्वती डाहुले, वीरमाता छाया नवले, शौर्यचक्राने सन्मानित माजी नायब सुबेदार शंकर मेंगरे यांचा शाल, श्रीफळ व एस.टी.बस प्रवासाचा धनादेश देवून सत्कार करण्यात आला. तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी तसेच पदवीत्तर अभ्यासक्रमामध्ये उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटण्यात आले. यात अर्पित हेपट, राघवी काळबांडे, प्रियांशु दास, पुष्पक हटवार, अभिषेक पाखमोडे, वैष्णव कोरे, दिलीप नान्हे यांचा समावेश होता. मागील वर्षीच्या ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय आस्थापनांचा देखील याप्रसंगी भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन अजय रविचंद्रन यांनी केले तर उपस्थितांचे आभार देवानंद काळबांडे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी सैनिक बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष हरिष गाडे, पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोबाटे, जयहिंद माजी सैनिक संघटनेचे विशाल तेलरंगे, आय.ई.एस.एम. संघटनेचे संयोजक विलास दवने, तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरमाता, वीरपीता, वीरनारी व विविध कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होती.