प्रा. अरविंद खोब्रागडे
चंद्रपूर :
करोना व्हायरस गेला तो लाखो जीव घेऊन.आजही करोना च्या व्हायरस ची चर्चा झाली की अंगावर शहारे येतात. नको ती आठवण म्हणून आपण दुसरीकडे लक्ष घालतो.मात्र करोना तर मार्गस्थ झाला पण गेल्या तीन वर्षांत दूरचित्रवाणी वाहिन्यांनी अंधश्रध्दा पसरविणारा जो व्हायरस निर्माण केला आहे तो अख्या पिढीला बरबाद करण्याचा संकल्प घेऊन आगेकूच करीत आहे.
एक आठवड्यापूर्वी एका मित्राचे सहज बोललेले एक वाक्य मला विचार करण्यास भाग पाडले. ते म्हणाले, “दारुड्या माणूस परवडला. तो स्वतःचे नुकसान करताना आर्थिक नुकसान करेल,मात्र अंधश्रद्धाळू आई परवडणारी नाही,ती पिढ्या न पिढ्यांचे नुकसान करते”.
अतिशय विचार करण्यास बाध्य करणारे हे वाक्य आहे.
हे वाक्य माझ्या मनात पिंगा घालत असतानाच रात्री घरी जेवण करताना दूरचित्रवाणी बघावीच लागते,कारण कुटुंबियांचे डेली शोप सिरिअल्स सुरू असतात. अर्थात मराठी वाहिन्यांचे. तो अर्धा तास घास तोंडात आणि लक्ष दूरचित्रवाणी वर असते.हा सर्वच कुटुंबातील लोकांचा उद्योग असतो.गेल्या चार वर्षात मी दूरचित्रवाणी वर एकही न्युज चॅनेल बघितले नाही पण मुकाटपणे मराठी मालिकांमध्ये लक्ष घालावेच लागते.
अलीकडे विविध कौटुंबिक मालिका सुरू आहेत.त्यात लहान मुले महत्त्वाची भूमिका करतात. त्यामुळे लहान मुले त्यात गुंतून मालिका बघतात. महिला तर दिवसभर या मालिकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या असतात. हीच संधी साधून निर्माते अंधश्रद्धा जोरकसपणे पसरवितात.
प्रत्येक मालिकांमध्ये नुसता खेळ मांडला आहे अंधश्रद्धेचा.
देव आणि त्यातून आलेली अंधश्रद्धा यावर प्रेक्षकांना खिळवून ठेवले जात आहे.नुकताच @तुझेच गीत गात आहे#या मालिकेचा एक भाग प्रसारित झाला. त्या मालिकेतील मुख्य पात्र-मल्हार कामत रुग्णालयात उपचार घेत आहे.मल्हार बरा व्हावा म्हणून त्स्वराज नामक लहान मुलगा पूजा अर्चा करतो.इथपर्यंत आक्षेप असण्याचे कारण नाहीच.कारण धर्माची संकल्पना संविधानाने स्पष्ट केली आहे.ज्याचा त्याचा धर्म आपल्याला पध्दतीने वापरावा. पण त्याही पुढे जाऊन तो मुलगा एक काळा धागा मल्हार ला बांधतो.यावरही आक्षेप असण्याचे कारण नाही,कारण हा झाला श्रद्धेचा भाग.पण खरी अंधश्रद्धा पुढे आहे. त्या मुलाने-स्वराजने बांधलेला धागा आणि मल्हारचे तात्काळ बरे होणे, त्यातही निष्णात असलेल्या डॉक्टरांनी हाच धागा त्याला बरा करणारा असल्याची ग्वाही देणे, ही खरी अंधश्रद्धा.
तो डॉक्टर म्हणतो केवळ हा धागाच रुग्णाला नवे जीवनदान देणारे आहे आणि मालिकेचा दिग्दर्शक आणि निर्माता तेच वदवून घेत असेल तर ही किती मोठी अंधश्रद्धा.
एडियट बॉक्स सद्या हेच काम करते आहे. देव आणि अंधश्रद्धा याची व्यवस्थित गुंफण घालून प्रेक्षकांच्या मनावर बिंबवले जात आहे.हिंदी आणि मराठी मालिका 7×24 हेच करत आहे.माहिती,मनोरंजन आणि शिक्षण हे माध्यमांचे मूलभूत कार्य. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आम्ही हेच मूलभूत कार्य शिकवितो. आता सध्याची परिस्थिती लक्षात घेता अंधश्रद्धा पसरवणे हेही महत्त्वाचे उद्धिष्ट असल्याचे सांगावे की काय असा विचार मनात आला तर त्यात वावगे काय?
कुठल्याही मालिका,चित्रपट प्रसारित होत असताना सेन्सॉरबोर्ड असते.पण त्यात आता अंधश्रद्धा हा पहिल्या पसंतीचा प्राधान्य क्रम असल्याने कुणीही आळा घालेल ही शक्यता सुतराम नाही.
सरकार नामक यंत्रणा त्याच विचारधारेचे असल्याने आणि त्यांना लोकांना त्यात गुंतवून ठेवायचे असल्याने तेच प्रसारित होणार आहे.त्यामुळे करोना सारख्या व्हायरस ला आपण हरविले असले तरी अंधश्रद्धा नामक व्हायरस तुमची पिढी बरबाद करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यातुन सुटका कशी करायची हे ज्याचे त्यांनीच ठरवावे.
चंपा सारखी लोक जे अकलेचे तारे तोडत आहेत,हा वर उल्लेखित कारभाराचा भाग आहे. कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जी शिक्षणाची गंगोत्री आणली तीच गंगोत्री असल्या मानसिकतेशी लढू शकते, हे चंपा आणि त्यांचे वैचारिक पालनकर्ते विसरलेले नाहीत.फक्त त्यांनी या गंगोत्री मधून पुढे आलेली लोक आता अंधश्रद्धेच्या चक्राह्यूहात अडकले असल्याचे अचूक हेरले असल्याने आपण काहीही बोललो तरी फरक पडत नाही हे मनात पक्के केले आहे.आणि तेच खरे आहे.
अरविंद खोब्रागडे, चंद्रपूर.
10/12/2022