लोकदर्शन आटपाडी 👉;राहुल खरात
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी महापुरुषांच्या बाबत केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात फार मोठा गदारोळ सुरू झालेला आहे. त्याबाबतअनेक मान्यवरांनी त्याबाबतचा विरोध, निषेध व्यक्त करीत आहेत. परंतु असे दिसते की, चंद्रकांत दादा पाटील हे आपल्या विधानावर ठाम आहेत.
वास्तविकता विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्य व कर्तृत्वाचा थोडासा अभ्यास केलेस काही महत्त्वपूर्ण बाबी समजून येतात. त्या खालीलप्रमाणे-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर :- १) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहीर पठ्ठे बापूराव यांची भेट दि. १० सप्टेंबर १९२७ रोजी मुंबई येथे झाली. शाहीर पठ्ठे बापूराव त्याकाळी तमाशा चालवीत असत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक मदतीची पैशाची पिशवी देण्यासाठी आले होते. त्यांनी पैशाची मदत देण्याचे जाहीर सुद्धा केले होते. परंतु डॉ. बाबासाहेबांनी ती आर्थिक मदत नाकारली होती. विशेषता ; अत्यंत अडचणीच्या वेळी चालून आलेली आर्थिक मदत नाकारल्यामुळे कार्यकर्ते बाबासाहेबांवर नाराज झाले होते. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते की, पठ्ठे बापूराव हा आपल्याच बायका तमाशात नाचवून पैसे कमवतो ते पैसे मी घेणार नाही. स्वाभिमान व नीतिमत्ता नावाची बाब लक्षात ठेवली पाहिजे. माझे कार्य थोडे उशिरा झाले तरी चालेल परंतु मी असली आर्थिक मदत घेणार नाही असे बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले होते.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व फिल्म अभिनेता दिलीप कुमार यांची भेट औरंगाबाद येथील अशोका हॉटेलमध्ये झाली होती, त्यावेळी दिलीप कुमार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन म्हणाले होते की, औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेज साठी आपणास मी पैशाची देणगी देऊ इच्छितो, माझ्या देणगीचा आपण स्वीकार करावा, त्यावेळी बाबासाहेबांनी दिलीप कुमारला स्पष्ट शब्दात सांगितले होते की, सिनेमासृष्टीतील लोकांना चारित्र्य नाही , त्यामुळे तुमच्या पैशाची देणगी घेवून मिलिंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तुमचा आदर्श देऊ इच्छित नाही. त्यामुळे मी तुमचे देणगीचे पैसे स्वीकारू शकत नाही . त्यासाठी बाबासाहेबांनी देणगीच्या पैशासाठी कधीही तडजोड केलेली नव्हती . कॉलेज बंद पडले तरी चालेल असे ठाम विचाराचे व तत्वाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले :- महात्मा ज्योतिबा फुले अत्यंत धनवान व्यक्ती होते. त्यांनी स्वखर्चाने शाळा उभ्या केलेल्या होत्या, पिण्याच्या पाण्याचे आड, विहिरी बांधलेल्या होत्या, मुलींच्यासाठी शाळा सुरू केलेल्या होत्या, तसेच अनेक समाज उपयोगी कामे केलेली आहेत. हे सर्व त्यांनी स्वखर्चातून उभे केलेले होते. या बाबतच्या अनेक नोंदी पुस्तकात आढळून येतात. त्यामुळे महात्मा फुले हे स्वाभिमानी, कर्तुत्ववान , कर्तबगार ,समाजसेवी व्यक्तिमत्व होते.
शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील :- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणाचा वट वृक्ष फार जोमाने उभा केलेला आहे. त्यामागे कष्ट, त्याग, विचार , स्वाभिमान दिसून येतो आहे . आपल्या पत्नीच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र व घरातील दागिणे विकून त्यांनी शिक्षण संस्था उभी केलेचे वास्तवात नमूद आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कॉलेजला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलेले होते. त्याकाळी एक फार मोठा पैसेवाला सेठ येऊन कर्मवीर भाऊरावांना म्हणाला होता ज्या कॉलेजला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलेले आहे ते नाव रद्द करून माझे नाव त्या कॉलेजला द्या. त्याबदल्यात तुम्ही सांगाल तेवढी देणगी देणेस मी तयार आहे. त्यावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वाभिमानाने त्या शेठला उत्तर दिले की, एक वेळ माझ्या बापाचे नाव बदलेन पण ज्या कॉलेजला छत्रपती शिवाजी महाराजांचे दिलेले नाव बदलणार नाही . असे निर्धार पूर्वक सांगितले होते.
परिवर्तन युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या कार्य व कर्तृत्वाचा इतिहास फार मोठा आहे. त्यांनी देश घडविला व स्वाभिमानाने उभा केला अशा या महानविभूतींच्या नावातच फार मोठे प्रकाशमान वलय आहे. महापुरुषांच्या नावाने उदाहरण देताना फार विचार करून बोलने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचाच विचार सर्वांनी करावा ही नम्र विनंती आहे.