लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती :– महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील पाटण, शेणगाव आणि जिवती या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन सेवा कलश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची विशेषतः क्षयरोगाचे रूग्ण या विषयी माहिती जाणून घेतली व सेवा कलश फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील क्षयरोगाचे रूग्णांना सकस आहार पुरविण्याचा संकल्प केला.
जिवती तालुक्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत आयोजित जिवती तालुक्यातील क्षय रोग निर्मूलनाकरिता जन सहभागातून अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये एक हात मदतीचा म्हणून क्षय रोग पीडित रुग्णांना ६ महिन्यापर्यंत सकस आहार देण्याचा संकल्प सेवा कलश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी घेतला आहे.
या प्रसंगी अभिजीत धोटे यांनी सांगितले की सेवा कलश फाउंडेशन हे समाजाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असेल, या परिसरातील क्षयरोगाची समस्या लक्षात घेऊन आम्ही ठरवले आहे की, क्षयरोगाचे रुग्णांना औषधोपचारासोबत सकस आहार आवश्यक असल्यामुळे जिवती तालुक्यातील पाटण, शेनगाव आणि जिवती या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी दोन प्रमाणे एकूण सहा रुग्णांना सहा महिन्याकरिता सकस आहार किट पुरविण्याचा आमचा संकल्प आहे. त्याचाच भाग म्हणून आज क्षयरोग रुग्णांना सकस आहार किटचे वितरण करण्यात आले. यामध्ये तेल, शेंगदाणे, सोयाबीन वडी, तुरीची डाळ, मुंग डाळ, मोट इत्यादींचा समावेश आहे. तसेच समाजातील नागरिकांनी समोर येऊन अशा रुग्णांसाठी आणि परिसरातील क्षयरोग नियंत्रण करण्यासाठी त्यांच्या वतीने जमेल तेवढी मदत करायला पुढे आले पाहिजे असे आवाहन अभिजीत धोटे यांनी केले आहे.
या प्रसंगी सरपंच सिताराम मडावी, जिवती नगर पंचायतचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावडे, अश्फाक शेख, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेंभे, प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणचे आरोग्य अधिकारी डॉ. छाया शेडमके, डॉ. कविता शर्मा, प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांवचे डॉ. हबीब शेख, प्राथमिक आरोग्य केंद्र जिवतीचे डॉ. गजेंद्र अहिरकर, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, परिचारिका आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.