लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*चंद्रपूर / यवतमाळ / नागपूर*:- ओबीसी, मागासवर्गीयांचे संरक्षक, शोषित, पिडीतांचे आश्वासक नेतृत्व लोकसेवक, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 02 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणुन पदभार स्वीकारला.
राष्ट्रीय मागासवर्गीय कार्यालयाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात पार पडलेल्या या पदग्रहण कार्यक्रमास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला, भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार नयाब सैनी, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांचेसह मागासवर्गीय आयोगाचे मान्यवर पदाधिकारी व आयोगाचे प्रमुख अधिकारी व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष हंसराज अहीर यांनी ओबीसी, मागासवर्गीयांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाबरोबरच संवैधानिक अधिकाराचे संरक्षण करुन त्यांच्या विकासाला गती देत राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा कसोशिने प्रयत्न केला जाईल अशी भुमिका व्यक्त केली.
अध्यक्ष पदाचा पदभार ग्रहण करताना त्यांनी महामहीम राष्ट्रपती महोदया, प्रधानमंत्री मान नरेंद्र मोदी जी, भाजपा पक्ष श्रेष्ठींना विशेष धन्यवाद देवून आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याचा मनोदय याप्रसंगी व्यक्त केला. मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करुन त्यांना भावी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.