ज्ञानेश वाकुडकर
…
तू ‘राम’ म्हण, ‘अल्ला’ म्हण
‘येशू’ म्हण, ‘साई’ म्हण
‘देव’ म्हण, ‘दूत’ म्हण
‘अवतार’ म्हण, ‘काही’ म्हण
मी हरकत घेण्याचंही
कारण नाही काही..
पण माणूस म्हणून एक गोष्ट
खरंच पटत नाही !
तू हवी त्याची पूजा कर
हवी त्याची आरती गा
मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन
प्रसाद म्हणून काही खा !
चोविस तास देव देव कर
वाटल्यास विसर घर
पण माझ्यासाठी दोस्ता फक्त
एवढा विचार कर !
देव म्हणजे सुपर पाॅवर
ब्रम्हांडावर ताबा
मग त्याचं ऑफिस गल्लीबोळात
कशाला रे बाबा ?
ऐकलं होतं.. देव असतो
उभा सत्त्यापाठी !
तरी त्याच्या अवती भवती
दलालांची दाटी ?
चोर, डाकू, बलात्कारी
सारेच त्याचे भक्त
देव काय नुसते चेहरे
बघत बसतो फक्त ?
असा कसा चिडत नाही
त्याला नाही भान ?
वरून तुझ्यासारखे मूर्ख
तिथंच देतात दान !
देवळा भवती भिकारी
लुळे पांगळे जीव
ज्याला असेल काळीज त्याला
पाहून येते कीव !
प्रश्न त्यांचे सुटत नाहीत
दुःख सरत नाही
तरी तुझा सुपर देव
काहीच करत नाही !
म्हणून म्हणतो डोकं वापर
गहाण नको ठेऊ
भुकेल्याला, तहानल्याला
घाल कधी जेवू !
अनाथ, कोवळ्या हातामधे
पाटी-पुस्तक ठेव
आई शप्पथ तुला सांगतो
तूच होशील देव !
——-
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर २८/०५/२०१६