*चिमुकल्यांचे ‘एक मूठ धान्य’, भटकंती कारागिरांचे गहिवरले मन*

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

शेटफळे गावामध्ये गदिमा स्मारकानजीक भटकंती कारागीरांची दोन पाले गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा उघड्यावर संसार थाटून आपली उपजीविका चालवण्यासाठी ही कुटुंबे काबाडकष्ट करून पोट भरत आहेत. शेतीची अवजारे दुरुस्त करण्याचा व्यवसाय असणाऱ्या या कुटुंबांना सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे म्हणावे तसे काम मिळत नाही. या पालातील लोकांचे हाल गावातील विद्यार्थी, नागरिक, शिक्षक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या रोजच दृष्टीस पडत होते. अशातच शेटफळे गावचे उपसरपंच श्री विजय देवकर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.2 शेटफळे चा शिक्षक स्टाफ यांच्या चर्चेतून या गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी *एक मूठ धान्य* हा उपक्रम राबवण्याचे ठरले. शाळा नंबर दोन शेटफळेच्या विद्यार्थिनी समोर ही कल्पना मांडण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी आणि त्यांच्या पालकांनी या उपक्रमांमध्ये उत्साहाने आणि हिरीरीने सहभाग घेतला आणि बघता बघता गरजूंसाठी मदतीचे हात उभे राहिले. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा प्रकारचे धान्य गोळा झाले.
आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी हे गोळा झालेले धान्य शेटफळे गावचे उपसरपंच श्री. विजय देवकर सर तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. सोमनाथ गायकवाड, शेटफळे गावचे पोलीस पाटील श्री दत्तात्रय क्षीरसागर, प्राध्यापक श्री चंद्रकांत गायकवाड, श्री. शिवाजी गायकवाड, श्री. रणजीत गायकवाड, श्री सुनील गायकवाड,श्री.भागवत गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ कोमल गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा पाटील मॅडम, शिक्षिका सौ राणी गायकवाड मॅडम, श्री जयवंत बंडगर सर, श्री सत्यवान माने सर, श्री. सागर नागणे सर, सौ. तेजश्री कदम मॅडम, श्रीमती. परविन बेगम पटेल मॅडम आणि विद्यार्थिनी यांचे उपस्थितीत गरजूंना धान्य देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सत्यवान माने सर यांनी केले आणि मनोगत शेटफळे गावचे उपसरपंच श्री विजय देवकर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी विनायक पवार आणि शंकर साळुंखे या मूळ तुळजापूरचे रहिवासी असणाऱ्या वयोवृद्ध भटकंती कारागीरांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. चिमुकल्यांच्या मदतीचा हात त्यांना भावुक करून गेला आणि प्रात्यक्षिकातून नैतिक मूल्यांची रुजवणुक विद्यार्थिनींमध्ये करण्याचा हा छोटासा उपक्रम उपस्थितांच्या दृष्टीने कौतुकास्पद ठरला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *