लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :-_महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे, चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड लिमी. चंद्रपूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर, राजुरा नागरी सह. पत संस्था मर्यादित राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी संस्था पदाधिकारी, संचालक व सेवक यांचेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राजुरा नागरी सह. पतसंस्था मर्यादित येथे आयोजित करण्यात आला. दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०२२ असे दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या अंतर्गत सहकरी कायदे, सहकारी पतसंस्थांची गरज, सहकारी संस्थेच्या माध्यमातून समाजाला होणारे फायदे आणि समजतील गरजू लोकांना मिळणारे रोजगार व अन्य लाभ. उत्कृष्ट संस्था कशी असावी आणि संस्था सुरळीत कशी चालवावी इत्यादी सर्व बाबींचा विचार करून अतिशय मौलिक माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली. उपस्थितीत सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, राजुरा नागरी सह. पतसंस्था मर्यादित ने २५,००० हजार रुपयांपासून सुरू होऊन आता ४० ते ५० कोटी पर्यंतची मजल मारली आहे. अर्थात हे सर्व पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम मिळून रोजगार उपलब्ध होतो. स्थानिक पातळीवर झटपट कर्ज, महिला सबलीकरण, सेवाभावी कार्य, विविध सुविधा यातून निर्माण होतात. स्थानिक परिसराच्या विकासासाठी हातभार लागतो.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा नागरी सह. मर्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे, कृ.उ.बा.स संचालक संभुजी येल्लेकर, सहकार शिक्षणाधिकारी तथा प्राचार्य एन. डी. पिंपलकर, सरव्यवस्थापक राजकुमार कुचनकर, व्यवस्थापक वर्षा जोशी, सर्व संचालक, अभिकर्ता, संस्थेचे कर्मचारीवृंद उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य एन डी पिंपळकर यांनी तर आभार प्रदर्शन सरव्यवस्थापक राजकुमार कुचनकर यांनी मानले.