लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :– तालुका क्रीडा समिती राजुरा च्या वतीने क्रीडा संकुल राजुरा येथे शालेय क्रीडा स्पर्धा २०२२ – २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत राजुरा तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक १२ ते २३ नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले असून या अंतर्गत कुस्ती, बुद्धिबळ, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो, व्हाॅलीबाल, मैदानी स्पर्धा, कराटे, योगासन, फुटबॉल, क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आज लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते मैदानी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आ. धोटे यांचे हस्ते भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, विनम्र अभिवादन करून व धावपट्टीचे पुजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले, की शालेय जीवनामध्ये क्रीडा स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या असून या स्पर्धांमधूनच राष्ट्रीय स्तरावरील उत्तम कामगिरी करणारे खेळाडू घडत असतात. विशेषतः मैदानी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मैदान गाजवण्याची संधी मिळत असते. अनेक विद्यार्थी या स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीच्या बळावर स्वतःचे, आपल्या शाळेचे, तालुक्याचे, देशाचे नाव उंचावत असतात. अशा प्रकारच्या स्पर्धांना नेहमी उत्तेजन देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे व त्यांना विशेष कामगिरीसाठी शाबासकीची थाप दिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याध्यापक प्रभाकर बोभाटे, तालुका क्रीडा संयोजक हरिश्चंद्र विरुडकर, क्रीडा शिक्षक किशोर चिंचोलकर, राजकुमार डाहुले, चंद्रप्रकाश बुटले, भास्कर फरकडे, पुंडलिक वाघमारे, सुभाष पिंपळकर, सरोज मॅडम, दुधे मॅडम, मल्लिक काझी यासह राजुरा तालुक्यातील विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.