लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात
एखादे ध्येय ठेवून वाटचाल करणे, त्यासाठी नियोजनबद्ध आखणी करणे, झोकुन देवून कामाला सुरुवात करणे, दरम्यानच्या काळात आलेले अडथळे प्रयत्न आणि निष्ठापूर्वक पार करणे, लोकांची गरज ओळखून मदत करणे, त्यांची आवड – गरज पाहून प्रशिक्षण देणे, त्याच्या उत्पादन ते विक्री प्रक्रियेची माहीती देणे, खरेदीदार मिळवून देणे आणि आर्थिक विकास साधणे अशा अनेक टप्प्यावर काम करणे सोपी गोष्ट नाही . संघटन, दुरदृष्टी आणि समाजातील आहेरे आणि नाहीरे वर्गामध्ये समतोल साधणे, हे जर करणे शक्य झाले तर काय होवू शकते त्याचे एक उत्तम उदाहरण सध्या आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे पहायला मिळत आहे .
ग्रामीण स्त्री शक्ती संस्था गोमेवाडी या नावाने २०१७ साली नोंदणीकृत झालेल्या या संस्थेने २०१९ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली . आणि पाठोपाठ कोरोणाचे आव्हान उभा राहीले . या आव्हानांवर मात करत ३ वर्षात या संस्थेने कामाची प्रचंड गती घेतली आहे . ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या पासून सामान्य कुटुंबातील महिला आणि त्यांच्या बचत गटामध्ये विश्वास निर्माण केला आहे . या संस्थेच्या कामाची दखल घेणे जितके गरजेचे आहे, तितके त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत इतरांनीही अशी उभारणी करणे गरजेचे आहे. म्हणूनच या संस्थेच्या कार्याचा मी थोडक्यात आढावा घेऊन एक आदर्श लोकांपुढे ठेवत आहे . ग्रामीण स्त्री शक्ती ही संस्था शेतकरी व शेतमजूर ( शेती सहाय्यक ) स्त्रीचे आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, स्वावलंबन, आत्मसन्मान यासह आत्मनिर्भर होणे आणि तिच्या कुटूंबाचे जीवनमान उंचावणे हे या संस्थेचे उद्दीष्ट आहे . माणदेशातील तीन जिल्ह्यात भविष्यात या संस्थेचा कार्यविस्तार होवू शकतो . इतकी त्यांची गती आहे . मात्र तरीही सध्या त्यांनी आटपाडी तालुक्यातील काही भागाला डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविताना त्यांनी महिला सक्षमीकरण, महिलांचे आरोग्य, किशोर आणि किशोरींचा विकास, त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न, त्यांच्या शारीरीक , मानसीक , वैचारीक उन्नतीसाठी कामगिरी साधली जात आहे . वर वर पाहता कोणीही, त्यात काय आहे ? असंख्य संस्था असे काम करीत असतात . सरकारच्या बचत गटांची चळवळ ही याच उद्दिष्टाने सुरु आहे . महिला आर्थिक विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग, नाबार्ड या संस्था मार्फत असे काम सुरुच आहे की ! मग इथे वेगळे काय सुरु आहे, असे कोणीही म्हणेल. पण या सर्व सरकारी यंत्रणांना मर्यादा आहेत . त्यांच्या कामात सातत्य नसल्यामुळे महिला वर्गामध्ये निराशा पसरते . उत्पादीत मालाला बाजार पेठ मिळत नाही . परिणामी धोंड गळ्यात पडते . बचत गटाची कर्जे अनुत्पादक कामासाठी काढली जातात, मग ती थकतात आणि बचत गट मोडतात . परिणामी निराशा पदरी पडते असे गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने दिसून आलेले आहे . या सगळ्यांमध्ये स्त्री शक्ती संस्थेचे कार्य मात्र त्याहून वेगळे भासते आणि त्यामुळेच हा लेखनाचा प्रपंच .
७ जून २०१९ रोजी निर्मलाताई आपटे यांच्या उपस्थितीत स्त्री सक्षमीकरणाच्या कामाला सुरुवात झाली . लोकांशी संपर्क साधण्यापूर्वी अभ्यास करावा लागतो, त्यातून त्यांच्या लक्षात आले की गोमेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लष्करात नोकरी करणारा वर्ग आहे . त्यामुळे आजी – माजी २२ सैनिकांचा सह कुटूंब सन्मान करून संस्थेने कामाची सुरुवात केली . या कार्यक्रमाला १२५ ग्रामस्थ उपस्थित होते . वास्तवीक २०१५ पासूनच ही संस्था कार्यरतच होती . पुढे श्रावण अमावश्येला संस्थेने मातृदिन साजरा केला . त्यामध्ये गावातील ज्येष्ट माता, कार्यकर्त्यांच्या माता आणि सासू मातांचा गौरव केला . चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देवीची गाणी असा शारदोत्सव साजरा करण्यात आला . ज्यामध्ये ४० मुली आणि ५० महिला सामील झाल्या . यातूनच श्री . गजानन हायस्कूल गोमेवाडी मधील किशोरवयीन मुलींना, शारीरीक विकास, स्वच्छता आणि सॅनेटरी पॅडस् वापराचे महत्व सांगीतले गेले . बचत गटातील महिलांच्या शाळा बाह्य मुलींसह ८५ मुलींना पॅडस् चे मोफत वाटप केले गेले . परिसरातील लोकांची गरज काय आहे आणि त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास होतो, त्यांच्या आरोग्य समस्या काय आहेत, याचीही माहीती संस्थेने वर्षभरापूर्वीच जमविली होती . परिणामी शेतकरी, शेतमजूर, कामगार महिला, द्राक्ष – डाळींब फळबागात काम करतात. तिथली कीटक नाशके, रासायनीक औषधे, यांचा परिणाम या कष्टकरी बाग काम करणाऱ्या महिलांचेवर होवून अंगावर पुरळ येणे, चक्कर येणे, मळमळणे, डोके दुखणे, डोळ्यांची आग आग होणे, श्वासाचा त्रास होणे, असे त्रास होतात हे लक्षात घेतले आणि यावर सुरक्षा साधने हाच उपाय आहे, हे समजावून बागेत काम करणाऱ्या महिलांना संस्थेने मास्क, गॉगल, टोपी, हँडग्लोज असा सुरक्षा संच द्यायचा आणि त्याचा वापर शेतात करायचा ठरविले . त्याचा परिणाम खुप चांगला झाला आणि महिलांचा हा त्रास कमी झाला . पुढच्या वर्षी याच महिलांना त्यांनी शेजारच्या सांगोला तालुक्यातील वाटंबरे या गावी नेवून प्रशिक्षण द्यायचे ठरविले . हे अनोखे प्रशिक्षण होते . डाळींब छाटणी हे काम पुरुषांचे मानले जाते, पण परिसरातील बागांची संख्या आणि मजुरांचे प्रमाण व्यस्त आहे . महिलांना हे काम शिकविले तर त्या प्रशिक्षित होतील आणि त्यांची मजुरीही वाढून मिळेल, हे लक्षात घेवून संस्थेच्या संस्थापक सदस्या, विद्यमान अध्यक्षा सुनेत्रा कुलकर्णी या सहा महिला प्रशिक्षणार्थीना घेवून डाळींब बागांमध्ये वाटंबरेला पोहचल्या . मधुकर पवार यांनी या महिलांना प्रशिक्षण देतील असा तज्ञ पुरुष ग्रुप निवडला . आणि डाळींब बाग कामाची सुरुवात कशी करायची . कोणत्या वयाच्या बागेतून कामाची सुरुवात करायची . पहिल्या दिवशी डाळींब झाडांचे स्वरूप, त्या झाडांची काडी कशी आहे, त्याची छाटणी कशी केली पाहीजे हे शिकविले . दुसऱ्या दिवशी या शिकावू महिलांना स्वतःच छाटणीला उभे केले . मर आणि तेल्या रोगाचे झाड ओळखणे, झाडाला गोलाई किती द्यायची, खोडे किती ठेवायची, असे सात दिवस प्रशिक्षण दिले गेले . आता या महिला स्वतः सक्षम बनुन इतरांनाही घडवित आहेत . त्यांच्यासह बचत गटातील इतर महिलांना शेतीतून सेंद्रिय भाजीपाला कसा निर्माण करायचा, तो स्वतः च्या घरात कसा वापरायचा आणि त्याची विक्री करून उत्पन्न व बचत कशी साधायची याची माहीती दिली गेली . एका दिनाचे महत्व साधून त्यांना बी – बीयाणे मोफत दिले गेले . त्याचा वापर करून आलेला भाजीपाला विक्री करण्यात आला . काही बाबतीत फसलेल्या प्रयोगावर पुन्हा काम सुरु झाले . या उपक्रमाने औषधे फवारलेल्या भाजीपाल्यापेक्षा सेंद्रिय भाजीपाला किती उपयुक्त आहे . त्यातून मळमळ, जळजळ आणि इतर साईड इफेक्ट कसे बंद झाले, याची खात्री खुद्द महिलांना पटविली गेली . आता हा सेंद्रिय भाजीपाला वाढवून महिलांना विक्रीचे एक साधन निर्माण केले गेले आहे . केंद्रिय मधमाशी अनुसंधान प्रशिक्षण संस्था सेवावर्धिनी पुणे तर्फे यातीलच अनेक महिलांना शेतीपुरक असा मधमाशी पालनाचा व्यवसाय शिकविला गेला . त्याचे व्यवस्थापन, मध, मेण यांची विक्री आणि यावरील संपूर्ण अर्थशास्त्र समजावून महिलांना प्रशिक्षण दिले गेले . मधमाशांचे परागीभवन मानव जातीसाठी कसे उपयुक्त आहे हे ही सांगीतले गेले. निसर्गपुरक जीवनशैली या भागात जोम धरू लागली आहे . एवढ्यावरच न थांबता शेतकरी, शेतमजूर महिलांना शासनाची ई श्रम कार्ड नोंदणी करता येते, त्याचे अनेक लाभ मिळतात याची माहिती देवून त्यांचे ई श्रम कार्ड आणि जन धन बँक खाती खोलण्यात आली . याद्वारे शासकीय योजनांचा लाभ महिलांना मिळेल अशी योजना करण्याचा संस्थेचा मानस आहे . असे एकाच वर्गाच्या क्षमतांपासून आर्थिक घडी बसविण्या पर्यंतचे काम सुक्ष्मपणे गेली ३ वर्षे करत गेल्याने हा एक मोठा प्रकल्प साकारला गेला आणि आपण हे सगळे प्रशिक्षण कधी घेतले आणि तो आपल्या जीवनाचा भाग कसा बनला, त्यातून आर्थिक हित कसे साधले गेले, हे मागे वळून पाहिल्यानंतर या श्रमिक महिलांनाही आश्चर्य वाटत असेल इतके त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडला .
महिलांचे आरोग्य या विषयावर या संस्थेने चांगले काम केले आहे . महिलां मधील अनिमिया निर्मूलन, शिबीरे, तपासणी औषधोपचार, सकस आहार, व्यसन मुक्ती आणि कीटक नाशकां पासून स्वतःचा बचाव, या बाबींच्या बरोबरच महिला व मुलीं मधील मासीक पाळीच्या समस्या, स्त्री – पुरुष समानता, मजूर महिलांच्या मुलींसाठी शैक्षणीक मदत उभी करणे, किशोर – किशोरींना कौशल्य प्रशिक्षण देणे, असे काम केले गेले . हिमोग्लोबीन १० पेक्षा कमी असणाऱ्या महिलांना सकस आहार आणि औषधे देताना कोराणाचा अडथळा आला . या महिलांचा रोजगारही बुडतोय हे लक्षात आल्यानंतर शिधा आणि सकस आहार दोन्ही देवून या महिलांसह कुटूंबाचा शारीरीक -हास होवू नये याची दखल घेतली गेली . जवळपास २२५ महिलांना शिधावाटप करण्यात आले . कोरोणा काळात त्यात सातत्य होते . या महिलांना स्वतः साठीही जगायचे असते हे संस्थेने शिकविले . असे म्हंटल्यास वावगे ठरू नये . संक्रातीच्या निमित्ताने गोमेवाडी, हिवतड भागातील १५ गर्भवती महिलांचे डोहाळे जेवण करून त्यात डॉक्टरांना निमंत्रीत करून माता – मुलाचे आरोग्य, स्तनपान, स्वच्छता, शासनामार्फत पुरविले जाणारे पोषक आहार, या सर्वांची माहिती दिली गेली . ही आवश्यक गोष्ट असते . ग्रामीण भागातील मुलांच्या आणि महिलांच्या आरोग्यासाठी मातेला चौरस आहाराची माहिती असेल तर कुटूंब निरोगी आणि सुदृढ होते . केवळ कांदा – भाकरी खाणे म्हणजे पोट भरणे झाले . जगण्यासाठी पोषक आहार असावा ही बाब सुद्धा लोकांना शिकविली पाहीजे . हे या कार्यातून लक्षात येते .
आर्थिक आणि संस्थात्मक उभारणी कशी असावी याचे प्रात्यक्षिक या संस्थेने ग्रामीण भागातील महिलांना दिले आहे . दोन देणगीदारांकडून शिलाई मशीन मिळवून, त्यांनी महिलांना प्रशिक्षण दिले . त्यातून ४० महिला प्रशिक्षित झाल्या . या महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे पहिले काम दिले गेले . आता या पिशव्या खपणार कोठे ? संस्थेने चितळे बंधू मिठाईवाले पुणे यांना संपर्क साधून त्यांच्यासाठी ७० हजार पिशव्या शिवून दिल्या . महिलांना या कामातून आर्थिक प्राप्ती तर झालीच . पण मोठे काम कसे मिळवायचे ? कसे पुर्ण करायचे ? याचे ही त्यांचे शिक्षण झाले . अशाच पद्धतीने खादी ग्रामोद्योग, पर्स बनविणे, कृषी उत्पादने, यांचेही प्रशिक्षण महिलांना देण्यात आले . याचवेळी महिलांमध्ये स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजीक, सांस्कृतीक उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या व्यक्तीमत्व विकासाची पायाभरणी केली गेली . ग्रामीण स्त्री शक्ती यांच्या कार्याचे महत्व इतर संस्थापेक्षा मला महत्वाचे वाटले . रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीच्या मान्यवरांनी बदलती परिस्थिती आणि संस्था व्यवस्थापन या विषयावर ग्रामीण स्त्रीयांना पाच दिवस प्रशिक्षण दिले . यामध्ये संस्था उभारणी कौशल्य, उद्योग, संस्थेची दीर्घकालीन भूमिका, क्षेत्र निहाय आव्हाने, आरोग्य शिक्षण, शेती आणि महिला बचत गटापुढील आव्हाने आणि उपाय, खादी ग्रामोद्योगच्या योजना यावर पोपटराव पवारांपासून गिरीष कुलकर्णींपर्यत मान्यवरांना आणून महिलांना प्रशिक्षण दिले गेले . हळूहळू गोमेवाडीतून हे काम वाढत शेजारच्या मानेवाडी, पळशी, हिवतड, मेटकरवाडी, अर्जुनवाडी, बाळेवाडी असे विस्तारत चालले आहे. अलीकडेच महिलांना मसाले, पापड ,चटणी, लोणची बनविण्याचे प्रशिक्षण देवून त्याचे पॅकिंग, मार्केटिंग आणि आत्मविश्वासाने व्यवसाय कसा करायचा ? कागदी पिशव्या कशा बनवायच्या ? वृद्धापकाळाचा विचार करून बचत, विमा, मेडिक्लेम यांचे नियोजन कसे करायचे आणि एकत्रित येवून व्यवसायाची उभारणी कशी करायची . हे शिकविले जात आहे . ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेचा खडकांवर अंकुर उगवण्याचा प्रयत्न आहे . सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी यांच्या धर्मपत्नी असलेल्या गोमेवाडीकर सौ . नीलामाई देशपांडे यांनी सर्व महिला – मुलींना बरोबर घेऊन ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेचे काम उभे केले आहे , ‘भारतीय स्त्री शक्ति’ या अखिल भारतीय संघटनेच्या त्या ३० वर्षे सदस्य असून १९९५ ते १९९८ या काळात या संघटनेच्या त्या राज्याच्या अध्यक्षही होत्या . सांगोला येथील ‘ माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ च्या संस्थापक सदस्य म्हणून ४८ वर्षे नीलामाई, महिलांसाठी कार्यरत आहेत .आजही त्या ‘माता बालक ‘ च्या ट्रस्टी आहेत, त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ मिळाला आहे . त्यांच्याच मार्गदर्शना खाली, ग्रामीण स्त्री शक्तीच्या संस्थापक सदस्या आणि विद्यमान अध्यक्षा सौ. सुनेत्रा कुलकर्णी यांनी आपल्या लक्षवेधी कार्याद्वारे ग्रामीण स्त्री शक्ती ही संस्था अल्पावधीतच नावारूपास आणली आहे.
सुसंपन्न असलेल्या परिवारात मी जन्माला आले असले तरी शेतात राबणारे आई वडिल व इतर नातलग यांना बघतच लहानाची मोठी होत असताना माझ्यात शेतीविषयी मोठे आकर्षण निर्माण झाले. कागदावर मालक असणाऱ्या पण पुरुष प्रधान संस्कृतीत वेठबिगारा सारखे राब – राबणाऱ्या, भिन्न जात धर्माच्या भगिनींचे दररोजचे दुःख मला अस्वस्थ करायचे, सतवायचे . दुष्काळ, पिढ्यान पिढ्याचे दारीद्र, त्यातून वाढीस लागलेला बकालपणा, बेभरवशाची शेती, शेत मालाच्या दराची नसलेली हमी, अज्ञान, व्यसने, अंधकाराच्या फेर्यातून होत असलेली ग्राम वाशीयांची फरफट, याने जीव कासावीस व्हायचा . भारत मातेची स्वतःला लेक मानणाऱ्या मला, या चौफेर दारीद्रयाचे सर्वत्रचे वातावरण रडवेले बनवायचे . या सर्वांसाठी आपण काही तरी करायचे, या ध्यासाने आणि आशाळभूत पणे माझ्याकडे पाहणाऱ्या जीवांना आधार व्हायचे या भावनेने, मी माझ्या उमेदीची २० वर्षे या सर्वांसाठी समर्पित करून, नानाविध प्रयोग – प्रकारातून एकमेकांना जीव देणारा, परस्परांवर अतुट प्रेम करणारा आणि प्रत्येकाचे दुःख आपले वाटणारा एक नवा संसार – प्रपंच उदयास आणला . अनेकांच्या सहभागाने साकारला गेलेला, जात – पात, रंग – रूप, लहान – मोठा, गरीब – श्रीमंत असे भेद गाडणारा माझा नवा परिवार साकारण्यात मला यश आले . ग्रामीण स्त्री शक्ती संस्था हेच या परिवाराचे वास्तव रूप आहे . या परिवाराच्या माध्यमातून शेकडो कुटुंबे उभी करायची आहेतच तथापि या संस्था – परिवाराच्या आधाराने देश – विदेशात चम चम चमकणारी हजारोंची नवी पीढीही घडवायची आहे . गोमेवाडीतून तेवणारी ही ज्योत जगाला प्रकाश देणारी महाज्योत बनवायची आहे . मला सारे जहाँच्या दुःखाला दूर सारणारी, सुनेत्रा कुलकर्णीच व्हायचे आहे. अशा उत्कट आणि उदात्त भावना संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा कुलकर्णी व्यक्त करताना दिसतात. आनेवाला पल, जानेवाला है , हो सके तो इसमे , जिंदगी बिता दो, पल ए जो जानेवाला है. शक्य झाल्यास , जाणाऱ्या प्रत्येक क्षणात, जीवन जगून घे, या गीताच्या पंक्तीतील आशयाप्रमाणे सौ . सुनेत्रा कुलकर्णी यांनी पायाला भिंगरी लावून, प्रत्येक उपक्रम स्वतः ला झोकून देत यशस्वी केला आहे . समर्पण म्हणजे काय असते . लक्ष पुर्तीचा ध्यास कसा असतो, हे सुनेत्रांनी आपल्या कष्टातून सिद्ध केले आहे . ३० वर्षाचे काम ३ वर्षात साकारावे. इतक्या उत्तुंग कार्याचा आलेख सुनेत्रानी आपल्या कार्यप्रणालीतून साकारला आहे . साहित्यीक ना .सं. इनामदार, माजी आमदार अँड. जयंत सोहनी यांच्या या गोमेवाडी गावच्या विकासासाठी एक पत्रकार म्हणून १९९४ पासून मी प्रयत्नरत आहे . गोमेवाडीचे माजी सरपंच पी .आर . देशपांडे आणि त्यांच्या धाडशी,ध्येयवेड्या, जिगरबाज आणि जहांबाज धर्मपत्नी सौ. वैजयंतीकाकी उर्फ रजनी देशपांडे यांच्या विचाराने प्रेरित होवून गोमेवाडीत आम्ही कार्यरत झालो होतो . २३ – २४ वर्षापूर्वी *माणदेश माऊली* नावाची बहुउद्देशीय आणि विशाल दृष्टीकोनाची एक संस्था स्थापन करून आम्ही सर्वांनी एक स्वप्न पाहीले होते . या भागाच्या विकासा बरोबरच लोकं इथल्याच *सर्व काही उपलब्ध असणाऱ्या या बझार* मध्ये चौफेर खरेदी करण्याइतपत सक्षम होतील, असे ते स्वप्न होते . त्यावेळी ते पूर्ण झाले नाही . तथापि पी .आर . देशपांडे काका – वैजयंतीकाकी देशपांडे या दांम्पत्याच्या कन्येनेच अर्थात सौ . सुनेत्रा कुलकर्णी आणि सुनेने अर्थात माजी अध्यक्षा सौ . मनिषा देशपांडे यांनी जिद्द आणि परिश्रमाने त्या स्वप्नाच्या पुर्ततेच्या दृष्टीने, सौ. अर्चना जगताप, वसुधा कुलकर्णी, स्मिता पोफळे , लक्ष्मी शिंदे, गायत्री कुलकर्णी, कल्याणी कुलकर्णी, रेश्मा पडळकर, सौ. जिजा आवळे, सुवर्णा ऐवळे, सविता जवळे, माधुरी जावीर, दया जावीर, रेश्मा बनसोडे, मनिषा देठे,अनिता मंडले, सुवर्णा जावीर, ताई कोळेकर वगैरे सहकाऱ्यांच्या साथीने जोरदार वाटचाल सुरु केली आहे . सेवा सहयोग पुणे आणि सेवावर्धिनी पुणे या संस्थानी गोमेवाडीच्या या संस्थेला लाखोंच्या देणग्या मिळवून दिल्या आहेत . त्यांच्या सह अन्य देणगीदारांच्या दातृत्वाने ही संस्था गरुड भरारी घेत आहे . या कार्यात सुनेत्रा आणि त्यांच्या सर्व सहकारी सर्वाथाने यशस्वी होतीलच अशी आशा आहे . त्या सर्वांच्या कार्याला शुभेच्छा .