लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि १२ नोव्हेंबर 2022रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील विविध गावामधून गेल इंडिया कंपनी कडून प्रोपेन पाईपलाईन तसेच पैट्रोलियम व खनिज पाईप लाईन प्रकल्प जात आहे. दरम्यान उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील शेतकऱ्यांनी एकजुट होऊन दिनांक ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी सदर प्रकल्पास प्रखर विरोध दर्शविला होता, शेतजमीनीतुन गेल इंडिया लिमिटेड या कंपनी मार्फत प्रोपेन पाईपलाईन तसेच पैट्रोलियम व खनिज पाईप लाईन विरोधात हरकत घेतलेल्या शेतकर्यांच्या अर्जावर बहुउद्देशीय सभागृह जे.एन.पी.टी.येथे दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २.३० वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे. गेल इंडिया कडून या सुनावणीच्या नोटिसा शेतकऱ्यांना बजावण्यास सुरवात झाली असून या नोटिस मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सदर सुनावणीस शेतकरी स्वतः अथवा आपले अधिकृत प्रतिनिधी यांनी आपल्याकडील मुळ कागदपत्रासह वेळेत हजर राहण्याची विनंती केलेली आहे. तसेच आपण अथवा आपले अधिकृत प्रतिनिधी वरील दिवशी व वेळी हजर न राहिल्यास आपणास काहीही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून पुढील योग्य ती कार्यवाही या कार्यालया कडून करणेत येईल. असे दर्शविले आहे. दरम्यान शेतजमीनीतुन पाईपलाईन टाकल्यास आजुबाजूचे क्षेत्र देखील लागवडीयोग्य राहणार नाही. शेतक-यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे तसेच भविष्यात वायुगळती सारखे प्रकार झाल्यास जीवीताला धोका निर्माण होणार आहे. याअगोदरही लगतचे क्षेत्रामधुन एल पी जी पाईपलाईन गेलेली असल्याने त्यामध्ये बरेच क्षेत्र संपादीत झालेले आहे. सदर संपादीत क्षेत्राची नुकसान भरपाई प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अदयापही मिळालेली नाही. त्यामुळे गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पास शेतकऱ्यांनी अगोदरच सक्त विरोध दर्शविले आहे.