लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना :– अमलनाला व पकडीगुडम मध्यम प्रकल्प कालवे सल्लागार समितीची आढावा बैठक लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलनाला निरीक्षण गृह गडचांदूर येथे पार पडली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी या प्रकल्पाद्वारे लाभक्षेत्र असलेल्या गावातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू व चण्याचे उत्पादन घेण्यासाठी या प्रकल्पाचे पाणी पुरवठा करण्यात यावे असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. तसेच प्रकल्पाच्या कालव्याची देखभाल उत्तमरीत्या करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी उपयोगात आणण्यास प्रोत्साहित करण्यास सांगितले तर कालवे सल्लागार समिती द्वारे आपल्या क्षेत्रातील अमलनाला पकडीगुड्डम मध्यम प्रकल्पा च्या माध्यमातून मिळणाऱ्या सिंचन उपयोगी पाण्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. सय्यद यांनी अमलनाला आणि पकडीगुड्डम मध्यम प्रकल्पात उपलब्ध पाणी साठ्याचे माहिती दिली. *अमनाला मध्यम प्रकल्पामध्ये* उपयुक्त पाणीसाठा २२.२४ द.ल.घ.मी. उपलब्ध असून यामध्ये अंदाजे बाष्पीभवन ५.५६ द.ल.घ.मी., बिगर सिंचन पाणी आरक्षण ३.३४ द.ल.घ.मी. सध्या सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठा १२.१९ द.ल.घ.मी. मुबलक प्रमाणात आहे. तसेच *पकडीगुड्डम मध्यम प्रकल्पामध्ये* उपयुक्त पाणीसाठा ११.८० द.ल.घ.मी. उपलब्ध असून यामध्ये अंदाजे बाष्पीभवन २.९५ द.ल.घ.मी. बिगर सिंचन पाणी आरक्षण २.५१ द.ल.घ.मी. सध्या सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठा ६.३४ द.ल.घ.मी. मुबलक प्रमाणात आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण लाभक्षेत्रातील गावे ३४ आहेत. प्रकल्पाद्वारे रब्बी हंगामासाठी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पाणी पुरवणे शक्य आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी दिली.
या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता वर्मा, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, ज्येष्ठ नेते नानाजी आदे, उपविभागीय कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी एस.पी.जामई, तालुका कृषी अधिकारी व्ही. के. मकपल्ले, टी. जी. आडे, सहायक गटविकास अधिकारी ताजने, कमलाकर भेंडे, गगया बोरावार, व्यंकटेश मुंडे, जंगू चीलराम, अशोक चांदेकर, शेकर परचाके, श्रीरंग पोतराजे, शुभम उरकुंडे, राहुल जुनगरे, रोशन कांडेकर, पुरुषोत्तम पिंपळशेंडे, पाणी वापर संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सदस्य यांची उपस्थिती होती. सभेचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी श्री. सय्यद यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन भारत पवार यांनी केले.