शंकर तडस
गडचांदूर :
पार्टी आणि पहाट याच्याशी संबंधित पक्षी कोणता असा प्रश्न अभिताभच्या KBC मध्ये विचारला तर त्यांचा कॉम्प्युटरजी कोणतेही उत्तर देवो आमच्या ग्रामीण भागात मात्र फिक्स उत्तर आहे कोंबडा..!! जोडधंदा म्हणून अनेक कुटुंबे कोंबडी पाळतात. ही सामान्य बाब झाली. कोंबडा मात्र अनेक कारणांनी पाळला जातो. पहाट झाली की घरोघरचे कोंबडे बाग देऊ लागतात. गावकरी जागे होतात. हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. आता जेव्हा निसर्गाचे गणित बिघडले तसे हा आपला कोंबडा कधीही वेळीअवेळी बाग देऊ लागल्याने गावकऱ्याची झोपमोड होऊ लागली आहे. तक्रार करावी तर गावभरच कोंबडे आहेत. कोणाला दुखवायचं तरी कसे, हा प्रश्न पडतो. या कोंबड्यांची उत्तम व्यवस्था करून तगडे बनविलेले असते. त्याच्या मजबुतीनुसार दाम मिळतो. पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत याला किंमत मोजली जाते. आता प्रश्न पडतो या कोंबड्यांचे काय केले जाते.आपल्या जवळपास एखादा कोंबडा असेल तर त्याच्या मालकाला हा प्रश्न विचारा तो अगदी डिटेल उत्तर देईल. लोकांची झोपमोड करणाऱ्या कोंबड्याची तक्रार पोलिसांत केल्याची एक बातमी टीव्हीवर काही दिवसापूर्वी झळकली होती. आमच्या कोरपना तालुक्यात असे हजारो कोंबडे झोपमोड करीत असतीलही परंतु अद्याप तक्रारीपर्यंत प्रकरण गेलेले नाही. तक्रार केली नाही म्हणून समाजाला त्रासदायक कित्येक बाबतीत उपाय केले जात नाही त्यातलाच हा प्रकार होय.