अरविंद खोब्रागडे
चंद्रपूर
पत्रकारिता म्हणजे सावित्रीचे वाण,असे आम्ही पत्रकारितेचे शिक्षण घेताना शिकलो. मात्र प्रत्यक्षात पत्रकारिता करताना सामाजिक वसा, सामाजिक जबाबदारी हे काय असते याचा प्रत्यय पदोपदी आला. पोटाला चिमटा देऊन पत्रकारिता करता येत नाही, हे आम्हाला उमजले. नंतर त्यातून मार्ग काढत पत्रकार आणि जाहिरात प्रतिनिधी कधी झालो,हे भल्या भल्या पत्रकारांना कधी कळलेच नाही. त्यातून काही पत्रकार वाम मार्गाला लागलेत. मात्र गेली 25 वर्ष पत्रकारिता हाच श्वास आणि ध्यास असल्यागत कोणतेही चुकीचे मार्ग न निवडता केवळ पत्रकार म्हणून मार्गस्थ झालेले आमचे परममित्र राजेंद्र मर्दाने हे खरंच पत्रकारितेच्या व्याख्येला शोभून दिसतात. व्रतस्थ पत्रकार असलेल्या आमच्या मित्राचा आज वाढदिवस.
राजेंद्र मर्दाने हे नाव वरोरा आणि चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या वेगळ्या धाटणीच्या पत्रकारित्यामुळे अति परिचित आहे. चार विषयात पदव्युत्तर पदवी सह तत्वज्ञान विषयाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले मर्दाने सर केवळ पत्रकारितेत रमले. रमल म्हणण्यापेक्षा त्यांनी हाच जीवनाचा अंतिम ध्यास समजला. वरोऱ्यात आम्ही शिकत असताना खांजी वार्डमधून जाताना पत्रकार राजेंद्र मर्दाने ही पाटी दिसायची. पत्रकारितेबद्दल आकर्षक असल्याने ही पाटी laksh वेधून घेत होती. कालांतराने पत्रकारितेच्या पदव्युत्तर वर्गात राजेंद्र मर्दाने दाखल झाले आणि ज्यांची पाटी बघून इतके वर्ष पाठांतर झालेले नाव पुढ्यात असल्याने आश्चर्य झाले. पत्रकारितेतील एक नाव सोबत असल्याचा आनंद झाला.ते पत्रकारितेचे शिक्षण घेण्यापुर्वीच दोन पदव्युत्तर पदवी प्राप्त झाले होते.
त्यांच्या चंद्रपुरातील पत्रकारितेचा श्रीगणेशा नवभारत हिंदी दैनिकात झाला. स्वर्गीय प्रकाश शर्मा यांच्यासोबत मजहर अली आणि मर्दाने हे पत्रकारितेचे बारकावे शिकु लागले.मी तेव्हा नवराष्ट्र दैनिकात उमेदवारी करत होतो.एकच कार्यालय असल्याने आमची गट्टी पुन्हा बहरली. त्यात आणखी एक नेक माणूस अजय धर्मपुरीवार मिळाले. त्यामुळे ते दिवस अतिशय सुंदर गेले. मर्दाने साहेबांना प्रकाशभाई नेहमीच म्हणायचे, राजेंद्र तू ये दलदल मे कैसा करेंगा, यह जगह तेरे लिये नही है. तू छक्केपंजे नही शिकेगा तो कैसा होगा.
यावर राजेंद्र फक्त हसायचे. नवभारत मधून राजेंद्र बाहेर पडले. अर्थात दररोजच्या प्रवासाने ते त्रासले आणि वरोऱ्यात ते पुन्हा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करू लागले. ते पुन्हा दैनिक भास्कर आणि लोकमत समाचार मध्येही गेलेत.गडचिरोली मध्येही ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुजू झाले पण त्यांचे मन रमले नाही.
पत्रकारिता म्हणजे बातमी हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे. जो जाहिरात देईल तोच पत्रकार अशी नवी व्याख्या जन्माला आली आहे. त्यामुळेच लिहिते पत्रकार आता दुरापास्त झाले आहेत. राजेंद्र जाहिरातीत कमी पडलेत.नेते किंवा जाहिरातदार यांच्या पुढ्यात उभे राहणे त्यांना अजूनही जमलेले नाही.मोठी बातमी प्रकाशित झाली की ते खुश पण याने पोट भरत नाही,हे त्यांना माहीत आहे मात्र त्यांचा स्वभाव हे करू देण्यास परवानगी देत नाही. आताही ते वरोऱ्यात तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत पण जाहिरात कला त्यांना अवगत झालेली नाही.सर्व पत्रकारांची दिवाळी धूम धडाक्यात साजरी होते पण मर्दाने अजूनही त्या मानसिकतेत पोचलेले नाहीत.
त्यांच्या कौटुंबिक समस्याही आहेत,मात्र त्या अतिशय धीरोदात्तपणे ते लीलया पार पाडतात. वडील गटविकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेत.आता वडिल नाहीत.आई आणि बहिणीची काळजी घेण्यासाठी त्यांनी अजूनही विवाह बंधन टाळले आहे.मोठे बंधू कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.अतिशय सुरेख कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले राजेंद्र मर्दाने पत्रकरितेच्या पाकिट संस्कृती पासून दूर आहेत. पत्रकारिता हाच ध्यास म्हणून जगणारे राजेंद्र खऱ्या अर्थाने व्रतस्थ आहेत.
जिंदादिल मित्र आहे. अशा मित्राच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासही आज उशीर झाला, त्यास तेच जबाबदार आहेत. त्यांनी आपली सुंदर छबी उशिरा पाठविली आणि त्यांच्यावरील लेखन प्रपंच उशिरा झाला.
मित्रा, पुन्हा शुभेच्छा.
अरविंद खोब्रागडे, चंद्रपूर
9850676782