शंकर तडस
कोरपना :
सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून तांदूळ, गहू आणि साखर नियमित वाटप केली जाते. त्यामुळे गरीब जनतेला मोठाच आधार मिळतो. त्यात भर म्हणून शासनाने दिवाळीनिमित्त यावेळी तेल, डाळ आणि रवा वाटप करण्याचे ठरविले. मात्र आदिवासीबहुल कोरपणा तालुक्यामध्ये कित्येक गावात अद्याप तेल, साखर, रवा पोहोचलाच नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही गावात मात्र वेळेवर तेल, साखर, रवा मिळाला असल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. एका स्वस्त धान्य दुकानचालकास विचारले असता अद्याप तेल, साखर, रवा, डाळ न मिळाल्याने या महिन्याचे वाटप केले नाही असे सांगितले. शासन विविध योजनाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असते. प्रसंगी वस्तू व आर्थिक स्वरूपात थेट मदती पोहोचवण्याचा शासनाचा उद्देश असतो. मात्र संबंधित यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे शासनाच्या अनेक योजना कुचकामी ठरत आहे. दिवाळी होऊन आठवडा लोटला तरी सुद्धा कोरपना तालुक्यातील 40 गावात अद्याप साखर, तेल, रवा, डाळ पोहोचली नाही. शासनाने याबद्दल त्वरित दखल घ्यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.