लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
घुग्घुस येथील अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त १६० कुटुंबियांच्या महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली व पाच महिन्यापासून घरभाडे मिळत नसल्याची समस्या सांगितली त्यांनी तत्काळ याची दखल घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली व भुस्खलनग्रस्तांची समस्या सोडविली. त्यामुळे मंगळवार २५ ऑक्टोबरला भुस्खलनग्रस्तांना सहा महिन्याचे घरभाडे मिळाले आहे. घरभाडे मिळताच कुटुंबियांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार मानले.
यापूर्वी भुस्खलनग्रस्त अमराई वार्डाच्या महिलांनी घटनास्थळाच्या रस्त्यावर बसून ठिय्या मांडला व काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी रेटून धरली होती.
घुग्घुस येथे अमराई वार्डात २६ ऑगस्ट रोजी भुस्खलन होऊन गजानन मडावी यांचे घर शेकडो फूट जमिनीत धसले. त्यामुळे येथील १६० कुटुंबियांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इतरत्र हलविण्यात आले होते. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भुस्खलनग्रस्त भागाची पाहाणी करून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर घुग्घुस मधील संपूर्ण अमराई वार्डाच धोकादायक स्थितीत असल्याने या वस्तीचे पुनर्वसन अत्यंत आवश्यक असल्याने काँग्रेस नेत्यांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सहा महिन्यात शासकीय घरपट्टे देऊन घर बांधून दिले जाईल तो पर्यंत नागरिकांना घरभाडे देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता.
आतापर्यंत फक्त एकाच महिन्याचे घरभाडे देण्यात आले तसेच घरपट्टे व घरे बांधून देण्यात आली नाही. त्यामुळे भुस्खलनग्रस्त अमराई वार्डातील संतप्त महिलांनी घटनास्थळाच्या रस्त्यावर बसून ठिय्या मांडला व काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी रेटून धरली होती.