लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 24 ऑक्टोंबर 2022
बीपीसीएल (भारत पेट्रोलिएम कॉरपोरेशन लिमिटेड) हा केंद्रशासनाचा राष्ट्रीय प्रकल्प उरण तालुक्यात भेंडखळ येथे कार्यरत असून भेंडखळ गावातील ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने बीपीसीएल प्रकल्पाला(कंपनीला) दिले. शेतजमीनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना नोकरी देण्याचे आश्वासनही कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र भेंडखळ येथील स्थानिक रहिवाशी असलेले प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांची जमीन (शेती) या प्रकल्पासाठी संपादित झाली असूनही या गोष्टीला आज जवळ जवळ 30 ते 35 वर्षे झाले तरीही अविनाश रमण ठाकूर यांना नोकरित सामावून घेण्यात आलेले नाही. गेली 30 ते 35 वर्षे लोकशाही व कायदेशीर मार्गाने सर्वच शासकीय विभागात कार्यालयात पत्रव्यवहार करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांनी भेंडखळ येथील बीपीसीएल कंपनी गेट समोरच सोमवार दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11वाजल्या पासून आमरण उपोषण सुरू केले होते. आज दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी आमरण उपोषणाचा 8 वा दिवस असूनही बीपीसीएल प्रशासनाने तसेच उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनीही या महत्वाच्या समस्याकडे पाठ फिरविल्याने तसेच एकदाही उपोषण कर्त्याची भेट घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्तामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
दि 17/10/2022 रोजी अविनाश रमण ठाकूर यांनी उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बिपीसीएल कंपनी गेटसमोर आमरण सुरु केले आहे. आज उपोषणाचा 8 वा दिवस असूनही अविनाश रमण ठाकूर यांच्या उपोषणाकडे तहसीलदार व बीपीसीएल प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषण कर्ते अविनाश ठाकूर यांनी केले आहे.अविनाश ठाकूर यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती होती.ती कंपनीला दिली .आता उपजिविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने अविनाश रमण ठाकूर यांना बीपीसीएल कंपनी प्रशासनाने नोकरीत सामावून घ्यावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी भेंडखळ ग्रामस्थ मंडळाने या आमरण उपोषणाला जाहिर पाठींबा दिला आहे. तसेच जेएनपीटीचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, शिवसेनेचे उरण विधानसभा संपर्क प्रमुख तथा कामगार नेते महादेव घरत,राष्ट्रवादी काँग्रेस कांग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मनोज भगत, भारतीय जनता पार्टीचे मिलींद पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा सूर्यवंशी, बहुजन क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष- मनोज रामधरणे, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष – धर्मपाल जाधव, राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC) मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष जंगबहादुर चौधरी, बहुजन मुक्ती पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे उरण तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर, छत्रपती क्रांती सेनाचे रायगड जिल्हाध्यक्ष-श्रेयश म्हसकर, वारकरी संप्रदायाचे प्रभाकर ठाकूर, भारतीय जनता पार्टी आदी विविध राजकीय पक्षाचे तसेच विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी हजर राहून अविनाश रमण ठाकूर यांच्या आमरण उपोषणास जाहिर पाठींबा दिला आहे.उपोषण मुळे तब्येत बिघडल्याने त्यांना मध्ये काही दिवस हॉस्पिटल मध्ये एडमिट सुद्धा करण्यात आले होते. मात्र पुन्हा त्यांनी कंपनी समोर उपोषण सुरु केले आहे.मात्र एवढे दिवस उलटून गेले तरी उपोषण स्थळी बीपीसीएलचे अधिकारी तसेच तहसीलदार यापैकी कोणीच फिरकले नसल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्रकृती खालवल्याने अविनाश ठाकूर यांना रविवार दि 23/10/2022 रोजी सकाळी 11:30 इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय मध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. माझे जीवाचे काही बरे वाईट झाल्यास बीपीसीएल कंपनी व महाराष्ट्र शासन यास जबाबदार राहील असे अविनाश ठाकूर यांनी यावेळी सांगितले.