चंद्रपूरच्या दीपकची लंडनच्या जागतिक आंबेडकराईट परिषदेत छाप

अविनाश पोईनकर

चंद्रपूर :

भारत, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटेन आदी देशांतील निवडक अभ्यासकांच्या उपस्थितीत जागतिक आंबेडकराईट परिषद डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील ऐतिहासिक निवासस्थानी पार पडली. जगभरातील अभ्यासकांसोबत चंद्रपूर येथील ॲड.दीपक यादवराव चटप यांनी प्रमुख वक्ता म्हणून या जागतिक परिषदेत छाप सोडली. परिषदेत ॲड.दीपक चटप यांच्या पाथ फाऊंडेशन व पुण्यातील वोपा संस्थेने तयार केलेल्या ‘आपले संविधान, आपली ओळख’ या संविधानिक मोफत अभ्यासक्रमाची घोषणा व विमोचन जगभरातील अभ्यासकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ॲड.दीपक यादवराव चटप हे चंद्रपूर जिल्ह्यातील लखमापूर या छोट्याशा गावातील असून लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेत आहेत. त्यासाठी त्यांना ब्रिटीश सरकारची चेव्हेनिंग ही जागतिक प्रतिष्ठेची ४५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कामाची दखल जागतिक स्तरावर होत असून जागतिक आंबेडकराईट परिषदेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आधुनिक भारतातील शिक्षण पद्धती’ या विषयावर विचारमंथनासाठी चटप यांना पाचारण करण्यात आले. भारतीय संविधान हेच देशासाठी सर्वसामान्यांना शिक्षणाचे कवाडे खुले करणारे क्रांतीकारी पाऊल आहे. विदेशात उच्चशिक्षण घेवून देशात सामाजिक परिवर्तन घडवण्याची प्रेरणा बाबासाहेबांनी वंचित-बहुजन समाजाला दिली असल्याचे प्रतिपादन जागतिक परिषदेत अँड दीपक चटप यांनी केले.

विधायक व रचनात्मक कामाचा ध्यास घेतलेल्या चटप यांच्या पाथ फाउंडेशन व वोपा संस्थेने एकत्रित येत ‘माझे संविधान माझी ओळख’ हा अभ्यासक्रम तयार केला. भारतातील शालेय विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्य, तरतुदी व महत्वाच्या कायद्यांची सोप्या भाषेत माहिती मिळावी या उद्देशाने समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण सहज उपलब्ध व्हावे या हेतुने लंडन येथील ‘आंबेडकर हाऊस’ येथे अभ्यासक्रमाची घोषणा व विमोचन ॲड.चटप यांनी केले. अभ्यासक्रम प्रक्रियेत पाथ फाउंडेशनचे अॅड. बोधी रामटेके, अॅड.वैष्णव इंगोले यांना प्रतीक पानघाटे, मानस मानकर, आदित्य आवारी, इतिहास मेश्राम, संज्योत शिरसाट, नम्रता मेश्राम, श्रुष्टी गोसावी यांचेसह महाराष्ट्रातील विविध भागांतील युवकांनी सहकार्य केले. तसेच पुणे येथील वोपा संस्थेचे प्रफुल्ल शशिकांत, राहुल बांगर, ऋतुजा जेव्हे, प्रतिमा कांबळे यांनीविशेष योगदान दिले. वोपाच्या ‘व्ही-स्कूल अॅप’ या मोफत डिजीटल प्लॅटफार्मला हा अभ्यासक्रम उपलब्ध झाला आहे.

——-

 

डॉ.बाबासाहेबांच्या लंडन येथील ऐतिहासिक घरी जगभरातील अभ्यासकांसमोर लंडन येथे पहिले भाषत देता आले, याचा मनस्वी आनंद आहे. डॉ.बाबासाहेबांची प्रेरणा घेवून संविधानातील मुल्यांची तळागाळात रुजवणूक व्हावी, यासाठी विशेष अभ्यासक्रमाचे लोकार्पण केले आहे. संविधानिक मूल्यांची जाणीव मनात रूजवत स्वतःच्या हक्कांसाठी जागृत असणारे विद्यार्थी हीच देशाची संपत्ती ठरेल, असा मला विश्वास आहे.

– ॲड. दीपक यादवराव चटप, लंडन

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *