लोकदर्शन👉 राहुल खरात
पलूस,कडेगाव ,खानापूर तालुका परिवर्तनवादी चळवळ व समाजवादी प्रबोधिनी परिसर शाखांच्या वतीने दिला जाणारा ,2022 चा ‘कॉ.बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार कॉ.विनोद निकोले यांना तर पर्यावरणवादी चळवळीतील ,धरणग्रस्त पुनर्वसन चळवळीतील लढाऊ नेत्या सुनिती सु.र. यांना कॉ. गिताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार’ जाहीर झाल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रा. डॉ. बाबुराव गुरव,भाई व्ही .वाय.पाटील, कॉ. मारुती शिरतोडे यांनी आज दिली.
भाई व्ही.वाय.पाटील यांनी सांगितले की वाझर येथील बळवंतराव शिरतोडे यांनी आयुष्यभर पुरोगामी परिवर्तनवादी विचार जपला.क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, जी. डी.(बापू )लाड यांच्या परिवर्तनवादी चळवळीत काम करून चळवळीला बळ दिले. मुलांना नातवंडांना पुरोगामी विचारांचे धडे दिले. स्वतः ते अखेरपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य म्हणून राहिले. त्यांचा श्रमिक कष्टकरी आणि कामगाराप्रती असलेला आदर तसेच डाव्या पुरोगामी चळवळीतील योगदानाच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी त्यांच्या पहिल्या स्मृती दिनापासून हा पुरस्कार देण्यात येतो.हे पुरस्काराचं अकरावे वर्ष आहे.कष्टकरी कामगार व उपेक्षिता साठी आयुष्य वेचणाऱ्या ,त्यांच्याशी निष्ठा ठेऊन सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात महान काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. आतापर्यंत आयटक कामगार संघटनेचे लढावू नेते प्रा.कॉ. तानाजी ठोंबरे , ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे, थोर स्वातंत्र्यसेनानी श्रमिक मुक्ती दलाच्या नेत्या क्रांतीविरांगना इंदुताई पाटणकर, सत्यशोधक शेतकरी क्रांती दलाचे राज्य संघटक कॉम्रेड किशोर ढमाले,बिडी कामगार संघटनेचे नेते, सोलापूरचे माजी आमदार कॉ.नरसय्या आडम,दै.दिव्य मराठीचे संपादक व साम टि.व्ही.चे माजी संपादक,लेखक संजय आवटे, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष कॉ. डॉ. भारत पाटणकर ,जलनायक भाई संपतराव पवार आदींना देण्यात आलेला आहे.त्याचबरोबर कॉम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तुत्वान महिला सन्मान पुरस्कार महाराष्ट्रातील महिलांच्या प्रश्नावर त्याचबरोबर डाव्या पुरोगामी चळवळीत शेतकरी कामगार कष्टकरी ,आदिवाशी यांच्यासाठी सक्रीयपणे आंदोलनात असलेल्या लढाऊ महिलांना प्रदान केला जातो. यापूर्वी भारतीय महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष कॉ.स्मिता पानसरे,आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ ज्येष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.कॉ.गेलं आॉमवेट व सेझविरोधी आंदोलनाच्या लढाऊ नेत्या कॉ.उल्का महाजन यांना प्रदान करण्यात आला आहे.2022 च्या पुरस्कारांचे संयुक्तरीत्या विचरण 8 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतीक चळवळीचे नेते कॉ.धनाजी गुरव व पुणे विधान परिषद पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण (अण्णा) लाड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ ,पुस्तक व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.उद्या कॉ.बळवंतराव शिरतोडे यांच्या अकराव्या स्मृतीदिनाच्या पूर्व संध्येला हे दोन्ही पुरस्कार जाहीर करीत आहोत.यावेळी दगडू जाधव,हिम्मतराव मलमे,विक्रम शिरतोडे,बाळासाहेब खेलकर आदी उपस्थित होते.