लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
राज्याचे मंत्री, वने,सांस्कृतिक कार्यमंत्री व मत्स्यव्यवसाय तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पालकमंत्री झाल्यानंतर काल प्रथम जिल्हा दौरा होता. पालकमंत्री म्हणून आज त्यांनी जिल्हा नियोजन समिती पहिली बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदारांनी त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला. गोंदिया जिल्ह्यात आगमन होताच अनेक ठिकाणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे थाटात स्वागत करण्यात आले.
ना.मुनगंटीवार यांच्या प्रथम स्वागतासाठी पावसानेही हजेरी लावली. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील साकोलीपासून त्यांच्या स्वागत, सत्कार कार्यक्रमांनी सुरूवात झाली. ती गोंदीया पोहोचेपर्यंत सुरूच होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या सुरवातीला सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील मेंढे, विधान परिषद सदस्य परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, मोरगाव अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे, आदी उपस्थित होते.
सुरवातीलाच पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते वनहक्क कायद्यानुसार सातबाराचे वाटप करण्यात आले. सोबतच दिवाळीसाठी किट लाभार्थ्यांना देण्यात आली. आमदार विजय रहांगडाले यांनी रानडुकरांचा पिकांना होणार त्रास सागितला. सातबाऱ्यावर झुडपी जंगलाची नोंद आहे. तिर्थक्षेत्राचा सातबारासुद्धा आहे. मोठ्या संख्येने लोक तेथे जातात. पण वनविभागाकडून अडचणी निर्माण केल्या जातात. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, सत्तेत असो किंवा नसो, ज्या भूमिका घेतल्या, त्या मुनगंटीवार यांनी पूर्ण केल्या आहेत. विरोधकांचीही कामे करणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर भाऊ आहेत, असे ते म्हणाले.
प्रत्येक वेळी वाढलेले मताधिक्यही त्यांच्या कामाची पावती आहे. वित्तमंत्री असताना राज्यात त्यांना पैशाचा महापूर आणला होता. तीन चार तिर्थक्षेत्र जिल्ह्यात आहे. त्यात मांडवदरी, कचारगड, प्रतापगड, बोरुंजा हे वनविभागाच्या अखत्यारीत येतात. लाखोंच्या संख्येने भाविक येतात. वनविभागाकडून अडचणी निर्माण केल्या जातात. वनजमीनीतून आपण त्या मुक्त कराव्या. अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आजर्यंत विधानसभा गाजवण्याचे काम केले आहे. ‘विकासपुरुष’ म्हणून त्यांची देशभर ख्याती आहे. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचा कायापालक पालकमंत्री असताना त्यांनी केला. आता गोंदियाचाही चेहरा मोहरा आपल्या कल्पकतेने ते बदलवून टाकतील, असा विश्वास आमदार डाॅ. परिणय फुके यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री म्हणून गोंदिया जिल्ह्यातील मुनगंटीवार यांची वाटचाल कर्तृत्वाने भरलेली असेल, असे खासदार सुनील मेंढे म्हणाले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आपले पालकमंत्री झाले, याचा आनंद आहे. त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. गोरगरीबांना न्याय मिळावा. विधानसभेत भाऊंचा आवाज नेहमी बुलंद असतो. विरोधात असतानाही मंत्री आणि अधिकाऱ्यांना ते सळो की पळो करून सोडतात आणि सत्तेत असताना वेगाने कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे. अभ्यासू नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला फायदा होईल, असे खासदार अशोक नेते म्हणाले.