लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )उरण – पनवेल रस़्त्यावरील फुंडे बस स्टॉप जवळील जीर्ण झालेल्या पुलाचे काम तसेच उरण – करंजा कोस्टल रोडच्या नव्याने डांबरीकरण करण्याचे काम सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हाती घ्यावे अशी मागणी उरण तालुका मनसेच्या वतीने सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार आणि द्रोणागिरी नोड येथील सिडकोचे वरिष्ठ अभियंता नाने साहेब ,एम.एम. मुंडे यांची दालनात भेट घेऊन उरण पनवेल रस़्त्यावरील पुलाच्या रेंगाळत पडलेल्या कामा बाबत आज धारेवर धरले.तसेच उरण – करंजा कोस्टल रस्त्यावर पडलेल्या खड्याची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर, तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी मनसेच्या वतीने सदर अधिकारी वर्गाना उरण – पनवेल रस़्त्यावरील फुंडे बस स्टॉप जवळील पुलाचे काम लवकरच हाती घ्यावे आणि तालुक्यातील सर्वच खड्डे युक्त रस्ते खड्डे मुक्त दिपावली पुर्वी करावे अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, उपतालुकाध्यक्ष राकेश भोईर , मंगेश वाजेकर, विभागध्यक्ष अंकुश तांडेल, सोमनाथ घरत, दीपक सुतार , सुनील भोईर , शहर अध्यक्ष धनंजय भोरे , रितेश पाटील, दिनेश हळदणकर , सतीश पाटील सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.याप्रसंगी सदर पुलाचे व दुरावस्था झालेल्या उरण तालुक्यातील रस़्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले.