लोकंदर्शन 👉 राजेन्द्र मर्दाने
*वरोरा* : अपयशाला खणून न जाता सदाशिव ताजने यांनी ‘ दिव्यांगाचे आव्हान काखेत बांधून आकाशाला गवसणी घालत ‘ धडधाकट समाजाला जिद्दीने प्रेरणा दिली. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येक सुदृढ व धडधाकट व्यक्तीला प्रोत्साहन देणारे आहे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे सचिव तथा स्वरानंदवनचे मुख्य व्यवस्थापक डॉ. विकास आमटे यांनी केले. सदाशिवराव ताजने यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.गोविंद कासट लिखित ” बाबा आमटे यांच्या आनंदवनातील सदाशिव ताजने ” या पुस्तकाच्या १३ व्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यपाल रा.सू.गवई यांच्या पत्नी कमलाताई गवई, डॉ. भारती आमटे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.गोविंद कासट, प्राचार्य सुभाष गवई, माजी नगरसेवक प्रभा आवारे, उमा कासट, आनंदवनाचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय पोळ, विश्वस्त सुधाकर कडू, माधव कविश्वर प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.आमटे पुढे म्हणाले की, सदाशिव ताजने यांचे आनंदवनात पदार्पण आणि माझ्या कार्याची सुरुवात १९७१ पासून सुरू झाली. स्वरानंदवनाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कार्यक्रम महाराष्ट्र भर त्यांनी केलेली आहे. या वयातही ते तितक्याच क्षमतेने आनंदवनाच्या विविध उपक्रमात हिरारीने सहभाग घेऊन प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करीत आहेत. त्यांचे कार्य धडधाकट माणसाला लाजविणारे आहे.
डॉ. कासट म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत तर डॉ. विकास आमटे यांचेही यावर्षी ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष आहे. डॉ.आमटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमरावतीकरांसाठी आनंदवनात १२ महिन्याच्या भेटीचे आयोजन करण्यात आले असून ही आनंदवनात ११ वी भेट आहे. आगामी २७ आक्टोंबर ( डॉ. विकास आमटे यांच्या वाढदिवशी) खास १२ वी भेट असून या १२ ही भेटीवर पुस्तक प्रकाशन करण्याचा मानस आहे. हे सर्व घडवून आणण्यासाठी सदाशिव ताजने महत्वाचा दुवा ठरले असून आनंदवनातील कार्यात त्यांचे भरीव योगदान आहे. असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
याप्रसंगी ताजने यांचा डॉ. विकास आमटे व लेडी गव्हर्नर कमलाबाई गवई यांच्या संयुक्तहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मारोतराव मगरे, लक्ष्मण प्रमाणे, विठ्ठलराव सोनेकर, दीपक शीव आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर स्वरानंदवन हॉल मध्ये पाहुण्यांना संगीत कार्यक्रम सुद्धा दाखवीण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोविंद कासट यांनी केले तर आभार राजेश ताजने यांनी मानले.