लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
मुंबई, दि. २१: काही वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्वानाच मोहित करणारी ‘वनराणी‘ ट्रेन कार्यान्वित होती. कालांतराने ही ट्रेन बंद पडली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटर (मृगया चिन्ह केंद्र), वन्यजीव रुग्णालय आणि कॅट ओरीएंटेशन सेंटर (मार्जार वंशाची सर्व माहिती देणारे केंद्र), आदी बांधकामांचा लोकार्पण सोहळा आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता.
श्री.मुनगंटीवार म्हणाले की, उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह प्रत्येकाला अशा ट्रेनचे आकर्षण असते. ही ट्रेन सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करत असल्याने या उद्यानात ट्रेन आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.
*टी फॉर टंडन, टायगर आणि ट्री*
अभिनेत्री रविना टंडन या राज्य शासनाच्या वन्यजीव सदिच्छादूत म्हणून काम करणार असून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांची मदत होणार आहे. जसे रविना टंडन यांना त्यांच्या सशक्त अभिनयासाठी महाराष्ट्रात ओळखले जाते तसेच महाराष्ट्र हा वाघ आणि वृक्ष लागवडसाठी सुद्धा ओळखला जातो. मी गेल्या वेळी वनमंत्री असताना राज्यातील वाघांची संख्या १९० वरून ३१२ करण्यासाठी आणि ५० कोटी वृक्ष लागवड हे प्रकल्प राबविल्याने याची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.
*वन संवर्धनासाठी आराखडा*
ज्याप्रमाणे शहरांच्या विकासासाठी विकास आराखडा असतो त्याच प्रमाणे वन विभागामार्फत वन संरक्षण व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. आईच्या आणि वनराईच्या सेवेचे मूल्यांकन होऊ शकत नाही त्यामुळे वनांचे महत्व प्रत्येकाला पटवून देण्यासाठी काम करण्यात येईल. उद्याने हे आपली मुक्त विद्यापीठ असून आनंद आणि ऊर्जा देणारी असल्याने या वनराईचे महत्व प्रत्येकाला पटवून देऊ असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.
खासदार श्री. शेट्टी यांनी यावेळी उद्यानात येण्यासाठी जे तिकीट काढण्यात येते त्याच्या दराकडे आणि उद्यानात आल्यावर पर्यटकांना आतमध्ये नाश्ता सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नलक्ष वेधले.
आमदार श्री. दरेकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे वन ग्रंथालय सुरू करण्याची मागणी केली. हे वन ग्रंथाय वन्यजीवांविषय माहिती देण्यासठी तसेचयेथे येणाऱ्या अभ्यासकांना माहिती घेण्यासाठी उपयोगी पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
अनिनेत्री रविना टंडन यावेळी म्हणाल्या की, वन्यजीव सदिच्छादूत म्हणून काम करणे हे सन्मानाचे काम आहे. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासाठी समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शासनाबरोबर काम करतील.
या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे माजी कार्यकारी संचालक इ्ररिक सोलेम,खासदार गोपाळ शेट्टी, सर्वश्री आमदार प्रविण दरेकर,आणि अभिनेत्री रवीना टंडन यांची प्रमुख उपस्थिती होती.
*८ वन्यजीव रुग्णवाहिका आजपासून कार्यान्वित*
राज्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आजपासून ८ वन्यजीव रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या असून आज त्याचे लोकार्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय ५० वनपाल आणि वनरक्षकासाठी देण्यात आल्या.ही सर्व वाहने अत्याधुनिक, सुसज्ज आणि गतिमान असणार आहेत.
आजच्या कार्यक्रमाला या वेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, वन बल प्रमुखाचे प्रधान मुख्यवनसंरक्षक डॉ. वाय. एल.पी. राव,वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक जी. मल्लिकार्जुन, आय टीआय प्राध्यापिका हरिप्रिया,आदी उपस्थित होते.