लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा :– सास्ती – राजुरा रस्त्याचे काम रखडल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे आणि दिवस रात्रीच्या अवजड वाहतूकीमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन लागत आहे. अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी या रस्त्यासाठी अनेकदा आंदोलने केली. तसेच आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आणि संबंधित विभागाकडे काम पुर्ण करण्यासाठी मागण्या केल्या. लोकभावना लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी विश्रामगृह राजुरा येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सास्ती – राजुरा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, रस्त्याचे काम अधिक मजबूत व्हावे, दिवसभर होणारी अवजड वाहतूक कमी करून रात्रपाळीत करावी, वेकोली कर्मचारी कामावर जाण्या येण्याच्या वेळी, शाळा, महाविद्यालय भरण्या सुटण्याच्या वेळेस अवजड वाहतूक सौम्य स्वरूपात सुरू ठेवणे, सास्ती कार्नरवर ट्राफिक पोलीस नेमणे अशा अनेक सुचना आमदार धोटे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होण्याचा आणि रस्त्याशी संबंधित अन्य समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रसंगी बैठकीला आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, तहसीलदार हरीश गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, सूर्जागड माईंनचे प्रोजेक्ट मॅनेजर एल साईकुमार, सा. बा. विभागाचे उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, अनंतराव एकडे, धोपटालाचे माजी सरपंच राजाराम येल्ला, राजु पिंपळकर, सास्तीचे संतोष शेंडे, रामपूरचे जगदीश बुटले, कोमल फुसाटे, ब्रिजेस जंगितवार, प्रभाकर बघेल यासह सास्ती, धोपटाळा, रामपूर चे नागरिक उपस्थित होते.