लोकदर्शन👉 राहुल खरत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील दलितांसाठी आणि देशासाठी आपले आयुष्य उन चंदनाप्रमाणे झिजवले हे आपणास ज्ञात आहेच. त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या महानिर्वाणानंतरही त्यांच्या परिवर्तनवादी विचारांचे, ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाबरोबरच त्यांच्या समाजोपयोगी विचारांचे… वारे देशभर वाहू लागले होते.
लेखक, आंबेडकरी जलसे, शाहीर, कवी व गायक …यांनी मोठ्या प्रमाणात कार्य सुरू ठेवले. ‘वामनदादा कर्डक’ सारख्या कवी व गायकाने आंबेडकरी विचार समाजात रुजवण्यासाठी आपली हयात घालवली.
शिक्षणाशिवाय प्रगती नाही, उद्धार नाही.ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांची भाषणे ऐकली,त्यांच्या पत्रकातील विचार वाचले त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले.
परंतु त्यावेळची सामाजिक परिस्थिती शिक्षण घेण्यास पोषक नव्हती. अज्ञान आणि दारिद्र्याने पिडलेल्या, मोलमजुरी, काबाडकष्ट करूनही पोटाची भूक भागवण्याची भ्रांत असलेल्या दलित व मागासवर्गीय समाजाने मुलांच्या शिक्षणाचा विचार करावा तरी कसा?अशी त्यावेळची परिस्थिती होती.
मूळ समस्या म्हणजे ‘विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय!’ ही होती.
‘बोर्डिंग’ हा शब्द वाचला आणि माझ्या माध्यमिक जीवनातील आठवणी जाग्या झाल्या. 1970 ते 1974 ही चार वर्षे मी पंढरपूरच्या ‘गाडगे महाराज विद्यार्थी वस्तीगृहात’राहून ‘आपटे उपलब्ध हायस्कूल’मध्ये शिक्षण घेतले. बोर्डिंग मधील प्रार्थना, जेवण,राहणे, अभ्यास, शिस्त …या सर्व गोष्टी आठवल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ मार्फत चालविलेले ‘गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह’ नसते तर मी आणि माझ्यासारखे शेकडो असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले नसते.
हे लिहिण्यामागचे कारण असे ‘साहित्यरत्न शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी’चे ‘सचिव’ आयु. विलास खरात यांनी लिहिलेला ‘बोर्डिंग’ हा डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह आटपाडी’च्या निर्मितीचा ‘वैष्णो टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेला ऐतिहासिक लेख!
आटपाडीजवळच्या 32गावातील दलित समाजातील लोकांनी परिसरातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृह काढण्यासाठी तक्त्यात बैठका घेतल्या. डॉ.आंबेडकर वस्तीगृहाच्या निर्मितीचा, संचालक मंडळाच्या धडपडीचा, त्यांची नावे, पहिले 27 विद्यार्थी, त्यावेळचे वस्तूंचे दर यांचा सविस्तर वृत्तांत विलास खरात यांनी दिला आहे. डॉ.शंकरराव खरात यांच्या साहित्यातून त्यावेळच्या दलित समाजाचे दुःख,वेदना व्यक्त झालेल्या आहेतच. या लेखात समकालीन अशा अंधारात असलेल्या, समाज परिवर्तनासाठी कार्य केलेल्या लोकांना उजेडात आणण्याचे काम विलास खरात यांनी केले आहे.विलास खरात व संयोजन समितीने डॉ. शंकरराव खरात जन्म शताब्दी निमित्त आयोजित केलेले दोन दिवसाचे साहित्य संमेलन राज्यभरातील व परिसरातील साहित्यिकांना प्रेरणादायी आणि सस्मरणीय असे ठरले आहे.
हा लेख म्हणजे आटपाडी येथे स्थापन झालेल्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवण्याची सोया केलेल्या बोर्डिंगचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
खरात यांचा पिंड इतिहास संशोधनाचा आहे. अशाच प्रकारचे संशोधन त्यांच्या हातून होत राहो. याबद्दल त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा!
–भास्कर बंगाळे, माळी वस्ती, टाकळी रोड, पंढरपूर,
जि.सोलापूर- 413304.
मो.9850377481