लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात
बॅन्ड मास्तर सुनिलराव ऐवळे अंतःकरण पुर्वक अभिनंदन ! संभाजीनगरच्या ( औरंगाबाद ) श्री . गणेश भक्तांनी, गणेश मंडळांनी, नेते मंडळींनी आपल्या ब्रास बॅन्डच्या कलाकारांच्या कलेला उत्तम दाद दिल्याचे पाहून समाधान वाटले. अत्यांनंद झाला .
आटपाडीच्या ब्रास बँन्ड ने गेली ७ दशके ५०० किमी परिघातील महाराष्ट्र , बेळगांव आणि विजापूर या कर्नाटकी जिल्ह्यांना भुरळ पाडल्याचा मोठा इतिहास आहे . सर्व प्रकारची वाद्ये ,सर्व गायन प्रकार, राग वगैरे शास्त्रीय पद्धतीने वाजविण्यात आटपाडीचा ब्रास बॅन्ड सर्वात अग्रभागी सदैव राहीला आहे .
रहायला घरे नाहीत, जनावरांना पालापाचोळा चारता येईल एवढीही जमीन नाही . वर्षभर कामाची शाश्वती नाही, घरची चुल कधी पेटेल याचा पत्ता नाही, पिढ्यान पिढ्याचे भीषण दारिद्रय, अंधश्रद्धा, व्यसने, मागासलेपण आणि कुपोषित बालके – माता , आजारी माणसे असेच काहीसे चित्र या वाजंत्री बांधवांचे पिढ्यान पिढ्याचे राहीले आहे . ना कोणाचा आधार, ना कोणाची मदत, ना कोणाचे सहकार्य . एकलव्या सारखे कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, रित्या पोटी तासन् तास रियाज करणाऱ्या या बांधवांमध्ये कोणाला आपला भाऊ – आपला दोस्त – आपला सवंगडी, श्रमतोय, खपतोय याची जाणीव झाली नाही . एक दोन आखणाच्या गळक्या पडक्या घराला सतरा ठिगळ लावून आरोग्याच्या जीवघेण्या कोंडाळ्यातच जगणाऱ्या या ब्रास बॅन्ड वाल्यांचे दुःख, व्यथा, वेदना कोणालाच आपल्या भासल्या नाहीत . अशा भयानक भीषण परिस्थितीत कसलीही आदळ – आपट – रडारड न करता, संगित – गाण्यावर प्रेम करत, आपली दुःखे विसरत प्रत्येक क्षण सकारात्मतेने जगणारा माझ्या आटपाडीचा ब्रास बँडवाला जगापेक्षा वेगळा आणि विश्वव्यापी कर्तृत्त्व – व्यक्तीमत्वाचा राहीला आहे . भागाचा – गावाचा नितांत अभिमान बाळगणाऱ्या या गरिबांनी सर्वत्र सदैव आटपाडीचाच जयघोष केला आहे . स्वत : पेक्षा आटपाडीचे नाव चौमुलखी दुमदुमले पाहीजे याच ध्यासाने यांच्या मागच्या अनेक पिढ्या संपल्या आहेत .
आधूनिकरणाचे वारे सर्वत्र वाहत असताना सर्वच पारंपारीक वादये खेळ वगैरे अनेकांवर मोठे संकट उभारले आहे . अलुतेदार बलुतेदार बांधवांच्या उद्योग व्यवसायांना सर्वत्रच घरघर लागली आहे . या सर्वच प्रकारच्या प्रतिकुल परिस्थितीत आटपाडीच्या होलार समाज बांधवांनी मोठ्या कष्टाने महत्प्रयासाने ही कला जोपासली आहे . एवढेच नव्हे तर संगित – वादन – गायनाच्या दुनियेत राज्यात आपले अव्वल स्थान सतत राखण्यात जीवनाचे समर्पण केले आहे . प्रचंड मेहनती, कलाप्रेमी या ब्रास बॅन्ड धारकांच्या संवर्धणासाठी फारसे प्रयत्न झाल्याचे ऐकीवात नाही . विकास कामांच्या नावाखाली , रस्ते, गटारी, समाज मंदिरे , स्मारके, सभा मंडपे वगैरे विविध कामासाठी शासनाचे लाखो कोट्यावधी खर्चणाऱ्यांना या ब्रास बँड वाल्यासाठी काही रुपये सत्कारणी लावावे असे वाटले नाही . शे – दोनशे कलाकार सराव करतील असे सर्व सोयी सुविधा नियुक्त पंचवीस – पन्नास कोटीचे एखादे कला संगिताचे दालन उभे करणे महत्वाचे वाटले नाही . आमदार – खासदार निवासातल्या सोयी सुविधां सारखे नसले तरी माणूस म्हणून वावरताना गरजेचे ठरेल असे १०० कुटुंबांना निवारा देईल असे ब्रास बॅड कलाकार निवास उभारणे कोणत्याच मान्यवराला अंतरीच्या ओढीचे वाटले नाही . कित्येक कलाकारांना वृध्दापकाळात आजारी अवस्थेत भीक मागत मिळेल त्या ठिकाणी वास्तव करीत जीवनाचा अंतिम श्वास घ्यावा लागला आहे . अशा भीषण वास्तव्याचा सामना करीत महाराष्ट्र गाजविणाऱ्या या माझ्या कलाकार बांधवांना नतमस्तक होवून माझा सलाम . अमुल्य किंमतीच्या या महान कलाकार ब्रास बॅन्डवाल्यांच्या संर्वधनासाठी सहृदयी कला – संगित – गायन – वादन प्रेमींनी पुढे यावे, सरकार नावच्या व्यवस्थेचे डोळे उघडण्यास या कलाकारांचा आवाज बनावे . राज्यातल्या शेकडो मानवतावादी ट्रस्ट नी पुढे येवून त्यांचे नांव उंचावणारी, इन्सानियतचा दाखला देणारी पन्नास एकरातील ब्रास बँड नगरी आटपाडीत साकारल्यास ते राज्याला देशाला नव्हे सारे जहाँला भुषण ठरेल . स्वातंत्रपूर्व काळात मुळच्या औंधाच्या – आटपाडीकर बाबालालभाई शेख ( महात ) या गुरुकडून मिळालेली ही कला या ब्रास बॅन्ड कलाकारांनी प्राणपणाने जपली आहेच तथापि किसनराव दौलतराव ऐवळे, विश्वनाथ दौलत ऐवळे, मुरलीधर दौलत ऐवळे, नंदकुमार निवृत्ती ऐवळे, किसनराव निवृत्ती ऐवळे, काशीनाथ निवृत्ती ऐवळे सारख्या दिवंगत आणि श्री . शिवाजी दौलत ऐवळे या ब्रास बँडमधील हिर्यांनी आटपाडीच्या दोन्ही ब्रास बँन्डना नावलौकीकाच्या दृष्टीने सोन्याचे दिवस आणले . देशभर गाजलेल्या पुण्याच्या प्रभात ब्रास बँन्ड मध्येही आटपाडीच्या अनेकांनी आपली कला गाजविली होती . हा भुषणावह इतिहास आहे . तथापि गरीब उपेक्षितांनी किती ही मोठा पराक्रम केला, विक्रम केला, दैदिप्यमान यश संपादन केले, तरी त्यांच्याकडे बघताना जातीच्या, गरीबीच्या दृष्टीने बघणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत गेल्याने असे शेकडो – गुणवंत – प्रज्ञावंत – यशवंत एकलव्या सारखे अंगठे कापून घेण्याच्या समाज व्यवस्थेतील काही घटकांच्या वृत्तीने सदैव दुर्लक्षीत – उपेक्षित वंचितच राहीले आहेत, हे भीषण वास्तव ज्या वेळेस बदलेल, त्यावेळेस कोणताही कलाकार, कष्टकरी, प्रज्ञावान, गुणवान , विसरला जाणार नाही, वंचित राहणार नाही, त्यालाही अच्छे नव्हे – सच्चे दिन आल्याचे दिसून येईल . आणि तो सुदिन लवकरच उजाडावा हीच सर्वांच्याच विधात्याकडे नम्र प्रार्थना अपेक्षा .