लोकंदर्शन 👉*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : गोंडवाना विद्यापीठात होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुकीत विद्यापीठाच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक आणि शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी, येथील गरजू विद्यार्थ्यांच्या व्यापक हितांसाठी ही निवडणूक लढण्याचा निर्णय आपण घेतला असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचचे सिनेट उमेदवार डॉ. सागर वझे यांनी येथील बाबुलाल फुड प्लाझा येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
डॉ. वझे पुढे म्हणाले की, अभाविप व शिक्षण मंच हे पदवीधर, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक या सर्व शैक्षणिक घटकांचे प्रतिनिधित्व करणारे अत्यंत प्रभावी असे संघटन आहे. विद्यार्थी हित केंद्रस्थानी ठेवून विद्यापीठ प्रशासनाचा कारभार सुरळीत चालवा यासाठी अभाविप व शिक्षण मंच महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. गत पाच वर्षात अभाविपच्या सिनेट सदस्यांनी ठळक व उल्लेखनीय कार्य केलेले आहे. यावेळी खुल्या प्रवर्गातून पाच व राखीव प्रवर्गातून पाच असे दहा उमेदवार अभाविप तर्फे सिनेट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात आहेत.
सिनेट उमेदवार म्हणून आपला परिचय देताना डॉ. वझे यांनी सांगितले की, ते मागील १९ वर्षांपासून जिल्ह्यात अस्थिशल्य चिकित्सक म्हणून कार्य करीत आहे. त्यांचे आजोबा, आई – वडील सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. एमबीबीएसचे नंतरचे डी.आर्थो.,एम. एस.(स्पोर्ट सायंस युके) शिक्षण २००३ मध्ये इंग्लंडला पूर्ण करून ते वरोऱ्यात परत आले व ९० वर्ष पूर्ण झालेल्या सुयोग हॉस्पिटल मध्ये रूजू झाले. अत्याधुनिक हॉस्पीटल ग्रामीण भागात सुरू करुन लोकांना परवडणारी व उच्च प्रतीची अस्थिशल्य उपचार सुविधा वरोरा येथे सुरू केली. आरोग्य क्षेत्रासोबतच महाविद्यालयीन तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी ते सदैव अग्रेसर राहतात. आनंदवन मधील कुष्ठरुग्णांना मागील दोन दशकांपासून ते मोफत उपचार देत आहेत. वरोऱ्यात होणाऱ्या सामाजिक कार्यातील त्यांचा हिरारीने सहभाग असतो. विदेशात शिक्षण प्राप्त केल्यानंतर तेथील शिक्षण प्रणाली ग्रामीण विद्यापीठात लागू करून आपले गोंडवाना उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वोत्तम व्हावे, हे ध्येय समोर ठेवून आहेत. सिनेट सदस्य म्हणून रोजगाराभिमुख शिक्षण शिकाऊ उमेदवारी व निवड शिबीर आयोजनाच्या योजनेला गती देणे, विद्यापीठात अद्यावत क्रीडा सुविधा निर्माण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होईल असे वातावरण रूजविणे, मॉडेल कॉलेजला सक्षम करणे, आदींसह विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे त्याचा त्यासाठीच्या आवश्यक त्या सोयी सुविधा आणि सवलती उपलब्ध व्हाव्यात असा मानस ठेवून या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी, विद्यार्थ्यांचे, पदवीधरांचे, प्राध्यापकांचे, विद्यापीठ स्तरावरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक भूमिकेतून निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. एक नवीन विचार, एक नवीन शिक्षण प्रणाली अंमलात आणण्यासाठी पदवीधर मतदारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या सिनेट निवडणुकीत विद्यापीठातील एकूण २३,६०० तसेच तालुक्यातील १२०६ पदवीधर आपला हक्क बजावणार आहे. तेव्हा अभाविप व शिक्षक मंचच्या उमेदवारांना आपल्या प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अभाविप व शिक्षण मंचचे निरीक्षक शाम ठेंगडी यांनी डॉ. सागर वझे यांच्या एकूण कार्यावर प्रकाश टाकला तसेच मतदान कसे करावे, याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.