लोकंदर्शन👉 नवनाथदादा भाग्यवंत
गणपतीचे दिवस म्हणजे लगबगीचे दिवस. या लगबगीच्या दिवसात भटजींना खूपच महत्त्व प्राप्त
होते. रात्री बारापासून गणपतीच्या प्रतिष्ठापनेकरता भटजी घराबाहेर पडतात. मग आपल्या घरी ते कधी येतात याची वाट पाहत बसण्याशिवाय काही गत्यंतर नसते. अशावेळी गणेशाची स्थापना घरच्या घरी कशी करावी? गणपतीच्या दहा दिवसांत आपल्या घरी ज्या श्रींची स्थापना करायची असते ती गणेशमूर्ती शाडूचीच असावी.
घरच्या प्रमुख व्यक्तीने शकत्यो आदल्या दिवशीच गणेशमूर्ती आणावी. त्याकरिता घरातून निघतानांच एक तबक, गुलाल, जानवे व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे. त्यानंतर वरती वर्णिल्याप्रमाणे गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व ‘मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करीत, आणलेल्या तबकात मूर्ती घ्यावी. जानवे शेजारी ठेवावे व त्यावर रुमाल झाकावा व मुलाबाळांसहित अत्यंत आनंदाने ‘श्रीं’सह घरी यावे.
घरी आल्यानंतर दरवाजातच थांबावे. घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी त्या मूर्तीवरून ओवाळून बाहेर ठेवावी व पतीच्या, मुलांच्या कपाळाला गुलाल लावून ‘गणेशा आपले सहर्ष आगमन असो’, असे म्हणून टाळ्यांच्या कडकडाटात श्रींना घरात घ्यावे. ज्या जागी स्थापना करायची, त्या जागेवर थोडय़ाशा अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटेच उठावे. स्नान उरकून अत्यंत शूचिर्भूत व्हावे. सोवळे, कद, नवीन धोतर नेसावे. कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. घरच्या देवांची पूजा करावी. त्यानंतर श्रींची प्राणप्रतिष्ठा करावी.
गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर.
पूजास्थानावर बांधण्याकरिता नारळ, आंब्यांचे डहाळे किंवा तोरण.
पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हन, समई, नीरांजन, शंख, घंटा,
हळद, कुंकू, अबीर, शेंदूर, गुलाल, रांगोळी, दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची पाने,
सुपा-या, विविध प्रकारची फुले, पत्रपूजेसाठी वेगवेगळी पत्री,
पंचामृत, वस्त्र, जानवीजोड, उदबत्ती, कापूर, खारीक, बदाम, नारळ, फळे
प्रसादाकरता मोदक किंवा मिठाई.
प्राणप्रतिष्ठा म्हणजे आपण आणलेल्या श्रींच्या मूर्तीत प्राण, जीव ओतणे. मातीच्या गोळ्यालाच (पृथ्वी अर्थात मातीपासून बनविल्यामुळे) पार्थिव म्हणतात. आता आपण जिथे काल आणलेली मूर्ती स्थापिली आहे त्याच्यासमोर पूर्वेकडे अथवा पश्चिमेकडे तोंड करून पाटावर बसावे. त्या अगदोर घरी आणलेली दोन विडय़ाची पाने, त्यावर सुपारी, एक रुपयाचे नाणे असा विडा व नारळ श्रींसमोर ठेवून नमस्कार करावा. त्यानंतर कलशातील पाणी पळीने घेऊन उजव्या हातावरून खाली सोडावे. असे तीन वेळा करावे. याला उदक सोडणे असे म्हणतात. चौथ्या वेळी हातावर पाणी सोडून हात पुसून घ्यावा. याला आचमन म्हणतात. त्यानंतर आपल्यासमोरील चौरंगावर उजव्या बाजूला दर्शनी कोपऱ्यात सुपारी ठेवावी. तिलाच गणेश मानून तिच्यावर अक्षता-फुले वाहावीत व दोन्ही हात जोडून-
वक्रतुंड महाकाय सूर्य-कोटी-समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।
अशी प्रार्थना करून प्राणप्रतिष्ठेचा संकल्प सोडावा. नंतर समई प्रज्वलित करून तिची पूजा करावी. त्यानंतर देव्हाऱ्यातील घंटा आणून, तिचाही नाद करत, तिलाही पूजेत ठेवून गंधाक्षताफुलांनी घंटेचीही पूजा करावी व म्हणावे- आगमरथ तु देवानां गमनरथ तु रक्षसाम् ।
कुर्वे घंटास्वं तत्र देवता आवाहनं लक्षणम् ।
आता नंतर ‘ॐ गं गणपतये नम:’ हा मंत्र सतत मनोमन म्हणत श्रीगणपतीच्या आणलेल्या नवीन मूर्तीला चौरंगावर, खाली अक्षता ठेवून स्थानापन्न करावे. गणपतीला, दूर्वाच्या जोडीला थोडेसे तूप लावून, मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना त्या दूर्वाचा स्पर्श करावा. मग मूर्तीच्या हृदयावर उजव्या हातांच्या पाचही बोटांनी स्पर्श करून त्यात प्राण ओतले जावेत, ती सजीव व्हावी अशी डोळे मिटून (अथवा मंत्र म्हणायचा असेल तर मंत्र पाहून)
अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य,
ब्रह्माविष्णुमहेश्वरा ऋषय: ऋक यजु: साम अथर्वण छंन्दांसि,
परा प्राणशक्तिर्देवता आं बीजम्, हृीं शक्ति:, क्रौं कीलकम् अस्य
श्रीगणेशस्य मृण्मय मूर्ती
प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।
ॐ आं हृीं क्रौं । अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ: ।
क्रौं हृीं आं हंस: सोऽहम् । प्राण इह प्राणा: ।
ॐ आं हृीं क्रों । अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ: ।
क्रौं हृीं आं हंस: सोऽहम् । जीव इह स्थित:।
ॐ आं हृीं क्रौं ।
अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ: ।
क्रौं हृीं आं हंस: सोऽहम्
सर्वेद्रियाणी वाङ्मन: – त्वक् – चक्षु: – क्षोत्र- जिव्हा – घ्राण – पाणि – पायु – उपस्थानि इहैव आगत्यं सुखं चिरं तिष्ठत्नु स्वाहा । देवस्य श्रीगणेशस्य गर्भाधानादिपञ्चदश – संस्कार – सिद्धर्य़थ पंचदश – प्रणवावृत्ती : करिष्ये। अशी प्रार्थना करावी जेणेकरून श्री मंगलमूर्तीची सर्व कर्मेद्रिये, सर्व ज्ञानेंद्रिये, जिवंत, सक्रिय व्हावीत. त्याचे कान, नाक, जीभ, हात, सर्व अवयव सक्रिय व्हावेत. त्याची वाणी, त्वचा, मन, नेत्र वगैरे सर्व सचेतन क्रियाशील व्हावेत. प्राणप्रतिष्ठा केल्यावर श्रींना गंध, अक्षता, फुले वाहून त्याचे रूप सजवावे. त्यानंतर पुन्हा ध्यान, आवाहन, आसन यासाठी मूर्तीच्या पायाला कुंकू लावून अक्षता अर्पण कराव्यात व आपल्या या घरी आलेल्या देवाला पुन्हा पंचामृत स्नान घालून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. एकवीस दूर्वाच्या एकवीस जुडींचा हार गळ्यात घालावा. लाल रंगाच्या फुलांचा हार गळ्यात घालावा. मग गणेशाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य व एकवीस मोदकांचा नैवेद्य खाऊ घालावा. घरातील सर्वानी मिळून भक्तिपूर्वक श्रींची आरती करावी. कापूर आरती करून सर्वानी घ्यावी व मग सर्वानी हात जोडून प्रार्थना करावी.
‘श्री रूपं देहिं जयं देहि। यशो देहि द्विषो जहि ।
पुत्रान् देहि धनं देहि । सर्वान् कामाँश्च देहि मे ।
अन्यथा शरणं नास्ति। त्वमेव शरणं ममं ।।
तस्मात् कारुण्यभावेन् । रक्ष रक्ष परमेश्वर।।’
यानंतर संपूर्ण दहा दिवस श्रींची नैवेद्यारती सकाळ-संध्याकाळ करावी. जमले तर दररोज सकाळी अथर्वशीर्ष म्हणावे. आपल्या संस्कृतीत बऱ्याचशा विधीत आगमन व विसर्जन हे दोन्हीसुद्धा अत्यंत भक्तिभावाने साजरे केले जातात. याप्रमाणे श्री गणेश चतुर्थीला श्रींचे आगमन व बरोबर दहाव्या दिवशी अर्थात अनंत चतुर्दशीला विसर्जन हेही ठरलेलेच.
गणपती बाप्पा ” मोरया ” मंगलमूर्ती ” मोरया “