लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्गुस येथील अमराई वॉर्डांत भूस्खलन झाल्याने एका नागरिकाचे घर जमिनीत गेले. या परिसरातील अन्य घरांना अशा प्रकारचा धोका होऊ शकतो. त्यामुळे ६७५०० वर्गमिटर मधील घरांना धोकादायक भाग म्हणून जाहीर करण्यात आले. यामध्ये १५२ च्या वर घरांच्या समावेश असून, ११२ घरे अतीधोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. स्थायी स्वरूपात निवाऱ्याची व्यवस्था होईस्तव त्यांना राहण्याकरिता ३००० हजार रुपये घरभाडे वेकोलि देणार असून हि रक्कम महसूल विभागा मार्फत प्रत्येक कुटुंबियांना देण्यात येणार आहे. त्यासोबतच पुढील काही महिन्यातच त्यांना स्थायी स्वरूपात राहण्याकरिता जमिनीचे पट्टे व त्यावर घरे बांधण्यासाठी शासन मदत करणार आहे. हि लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांच्या माध्यमातून पूर्ण झाली असून येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, निवासी जिल्हाधिकारी मेश्राम, उपविभागीय अधिकारी घुगे, वेकोलिचे महाप्रबंधक आभाशचंद्र सिंग, जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम, तहसीलदार गौंड, नगर परिषद मुख्याधिकारी पिदूरकर, डीजीएमएस चे अधिकारी, ठाणेदार बबनराव पुसाटे, शहर अध्यक्ष राजू रेड्डी, किसन जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती सेल पवन अगदारी, सय्यद अन्वर शेख, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी, अलीम शेख यांची उपस्थिती होती.
घुग्गुस येथील अमराई वार्डात राहणार्या श्री. गजानन मडावी यांचे राहते घर अचानक पणे भूस्खलन होऊन जमिनीखाली गाडल्या गेले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच तातडीने याठिकाणी भेट देऊन खासदार बाळू धानोरकर यांनी पाहणी केली होती. यासंदर्भात वेकोलीचे महाप्रबंधक अभाशचंद्र सिंग व तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्याशी बैठक वेकोलिच्या विश्रामगृहात घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी खासदार बाळू धानोरकर यांना बाधित जागेच्या नकाशा दाखवून पर्यायी व्यवस्थांबाबत चर्चा केली होती. सन १९०२ ते सन १९४० पर्यंत या भागामध्ये इंग्रजकालीन भूमिगत कोळसा खाण होती. व १९५० ते १९८४ पर्यंत देखील भूमिगत खान होती. त्यानंतर या ठिकाणी खुली खदान सुरु झाली. पूर्वीच्या अंडरग्राउंडच्या दोन गॅलरी जंक्शन मध्ये हा भाग खचला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्याची गरज आहे. त्यामुळे तात्काळ जमिनीचे पट्टे व घरे बांधण्यासाठी शासकीय मदत तात्काळ देण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
*घुग्गुस नागरिकांकडून खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार*
चंद्रपूर : घुग्गुस येथील अमराई वार्डात राहणार्या श्री. गजानन मडावी यांचे राहते घर अचानक पणे भूस्खलन होऊन जमिनीखाली गेले होत. या परिसरातील शेकडो कुटुंबियांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यांची तात्काळ दखल खासदार बाळू धानोरकर यांनी घेऊन शेकडो कुटुंबियांच्या निवाऱ्याचा प्रश्न महसूल व वेकोलिच्या माध्यमातून त्यांनी मार्गी लावला. त्यामुळे घुग्गुस येथील नागरिकांनी खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार केला. यावेळी नागरिकांना त्यांचे हक्क मिळून देण्याकरिता त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.