लोकदर्शन👉विठ्ठल ममताबा
शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी ने आयोजित केले होते कार्यक्रम.
उरण दि २३.ऑगस्ट नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि मुंबई परिसरात राहणारा लिंगायत समाज एकत्रित यावा आणि लिंगायत धर्म विचार तथा संस्कार आपल्या कुटुंबामध्ये रुजावेत यासाठी शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने दरवर्षी पवित्र श्रावण महिन्यामध्ये ‘श्रावण संध्या’ ह्या कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते. यावर्षी सुद्धा नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये ‘श्रावण संध्या’ कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडले. आपल्यातील असणाऱ्या सुप्त कलेला आणि आपल्यातील प्रतिभेला वाव देण्यासाठी शरण संकुल संस्थेने सर्वांसाठी ‘श्रावण संध्या’ च्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठावर परिवारातील अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ सदस्यांना यात भाग घेत येतो.चित्रकला स्पर्धा, वचन गायन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा वगैरे अनेक स्पर्धेचे आयोजन केले गेले होते, या स्पर्धेमध्ये अनेकांनी भाग घेऊन सर्व उपस्थितांसमोर आपली कला सादर केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका धामणकर (स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘लग्नाची बेडी, फेम राघवची आई राजश्री) उपस्थित होत्या, सन्माननीय पाहुणे म्हणून मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते. प्रसिद्ध लेखक, पत्रकार शरण साहित्य अध्यासन केंद्राचे प्रमुख चन्नवीर भद्रेश्वरमठ यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले होते.या सर्वांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. समाजात अंधश्रद्धा कशी भिनत जाते आणि त्याला आपण कसे बळी पडत गेलो याचे अतिशय सुलभ पद्धतीने चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी विवेचन केले. महात्मा बसवेश्वरांनी म्हणूनच कर्मकांड पोथी पुराण यांना नाकारत श्रमाला महत्व दिले.आणि सर्वसमावेशक समानतेची विचारधारा समाजामध्ये वचन साहित्यद्वारे रुजवली असे चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रसिद्ध अभिनेत्री रसिक धामणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लहान मुले आणि महिलांचा उत्साह पाहून भारावून गेले. मुंबई सारख्या मोठ्या शहरात लिंगायत समाजाला एकत्र आणण्याचे खूप मोठे कार्य शरण संकुल ही संस्था अतिशय प्रामाणिकपणे करत असल्याचे पाहून खूप अभिमान वाटल्याचे अभिनेत्री रसिका धामणकर यांनी सांगितले. मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष चे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आपल्या समाज बांधवांकडून सन्मान होणे हा खरंच माझ्यासाठी गौरवस्पदाचा क्षण आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय सुविधा मोफत पोहोचविण्याचे कार्य मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने निरंतर रुग्ण सेवा कार्य चालू असल्याचे असे मंगेश चिवटे यांनी सांगितले. शरण संकुल च्या “शिक्षण निधी’ ला मंगेश चिवटे यांनी त्वरित देणगी देत आपले अमूल्य योगदान दिले आणि इतर लोकांना सुद्धा या ‘शिक्षण निधी’ मध्ये भरभरून योगदान देण्यास सांगितले. स्पर्धेत भाग घेतलेल्यांना आणि विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास सर्वप्रथम हजर असणाऱ्या पहिल्या दहा दाम्पतीयांना विशेष भेटवस्तु देण्यात आली. दहावी व बारावी मध्ये गुणवत्तापूर्णक उत्तीर्ण झालेल्या लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सन्मान करून प्रत्येकांना रोख रककमेची पारितोषिक देण्यात आली. प्रसिध्द भरतनाट्यम् नृत्यांगना कु. ऐश्वर्या साखरे आणि त्यांच्या चमूने सर्वांसमोर अतिशय सुंदर नृत्य सादर केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनीता बिराजदार,सुवर्णा मेणकुदले,वृंदा येळमली,वैशाली मेणकुदले,सुषमा जिरळी,भारती यांनी काम पहिले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारे शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी ने आयोजित केलेला ‘श्रावण संध्या-२०२२’ हा पारिवारीक कार्यक्रम खूप उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. सभागृह उपस्थितांनी पूर्ण भरून गेले होते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सर्वानी सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खूप मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे श्री शिवयोगीमठ, रामलिंगय्या, सुनील पाटील, जगदिशप्पा, के. उमापती, प्रकाश अवरनळ्ळी, वैजनाथ आग्रे, सिद्धप्पा हसबी, प्रकाश जंगम, मंठाले, महेश मुक्कनवार, बडदाले व आनंद गवी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद गवी यांनी केले.