लोकदर्शन👉 *राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ( मुख्य) परीक्षा २०२० नागपूर केंद्रातून उत्तीर्ण होत येथील लक्ष्मी नगर, अभ्यंकर वार्डच्या पूजा विठ्ठलराव कोंगरे हिने महिला सर्वसाधारण गटातून राज्य पातळीवर २७६ गुणांसह चमकदार कामगिरी केल्याने वरोऱ्याचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पूजाच्या यशाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लक्ष्मी नगर येथील सेवानिवृत्त कर्मचारी श्री विठ्ठलराव कोंगरे यांची सुपुत्री पूजा विठ्ठलराव कोंगरे हिने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या काही गुणांनी हुलकावणी दिल्याने पुन्हा जोमाने अभ्यास केला. अभ्यासक्रमाशी निगडित माहितीच्या नोट्स काढल्या व परिश्रमपूर्वक अभ्यास केला. दुर्दम्य इच्छाशक्ती, अभ्यासात सातत्य, जिद्द, मेहनत व चिकाटी तसेच आई वडिलांचे वेळोवेळी यथोचित मार्गदर्शन याची परिणती म्हणजे हे यश होय. पूजा विठ्ठलराव कोंगरे हिची जल संसाधन विभागात असिस्टंट इंजिनिअर ( सिव्हिल) पदी निवड झाली आहे. पूजा हिचे वडील श्री विठ्ठलराव कोंगरे जल संसाधन विभागातून सेवानिवृत्त होऊन सध्या शेती करीत असून आई ह्या गृहिणी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यात महिलांचा टक्का कमीच त्यात या स्पृहणीय यशामुळे परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून पूजासह तिच्या आई वडिलांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याने ते अक्षरशः भारावून गेले आहेत.