लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 4 जुलै उरण तालुक्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल मध्ये पाणी टाकून पेट्रोल विकण्यात येत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. काही दिवसा पूर्वी केअर पॉईट हॉस्पिटल बोकडविरा येथे असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल मध्ये पाणी निघाले होते. ग्राहकांच्या, जनतेच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस प्रशासनाला कळविले. व लगेचच पोलीस प्रशासनाने या पेट्रोल पंपावर कारवाई केली. मात्र तोच प्रकार खोपटे ब्रिज जवळ असलेल्या आनंदी पेट्रोल पंपावर झाला आहे.
आज दिनांक 4/8/2022 रोजी दुपारी 1:18 वाजता खोपटे ब्रिज जवळील आनंदी पेट्रोल पंपावर डोलघर येथील ग्रामस्थ शशांक गायकर व विघ्नेश पाटील हे बाईक मध्ये पेट्रोल भरायला गेले असताना त्यांनी बाईक मध्ये पेट्रोल भरले मात्र बाईक पुढे जाताच अचानक बंद पडली. पेट्रोल चेक केले असता पेट्रोल मध्ये पाणी आढळून आले. याचा जाब पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना विचारले असता कर्मचाऱ्यांनी त्यांना उलट सुलट उत्तरे दिली. परत विघ्नेश पाटील यांनी डबल 100 रुपयाचे पेट्रोल एका स्वच्छ बाटलीत विकत घेतले. त्यातही पुन्हा पाणी आढळले. सदर ग्रामस्थांनी याबाबत पेट्रोल पंपचे मॅनेजर भरत म्हात्रे यांना विचारले असता पेट्रोल पंपचे मालक प्रीतम ठाकूर असून पेट्रोल पंप दोन महिने झाले बंद होते. पेट्रोल पंप आजच सुरु केले त्यामुळे हा प्रकार झाल्याचे सांगितले. व पेट्रोल मध्ये पाणी असल्याची कबुली देत मॅनेजर यांनी आपली चूक मान्य केली. उरण मधील खोपटे ब्रिज जवळ असलेल्या आनंदी पेट्रोल पंपावर कारवाई करावी अशी मागणी शशांक गायकर, विघ्नेश पाटील यांच्यासह जनतेने केली आहे.
उरण मध्ये भेसळ युक्त पेट्रोल अनेक ठिकाणी मिळत आहे. पेट्रोल मध्ये पाणी मिसळून पेट्रोल देण्यात येत आहे. मात्र पोलीस प्रशासनातर्फे थातूर मातुर कारवाई करून त्यांना सोडून दिले जाते. त्यामुळे पेट्रोल पंप चालक मालकांवर, कर्मचाऱ्यांवर कोणाचेही वचक नसल्याचे दिसून येते.उरण मध्ये पेट्रोल पंपावर असे ग्राहकांना फसवणूकीचे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. भेसळ करून पेट्रोल विकणाऱ्या पेट्रोल पंप चालक, मालक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.