लोकदर्शन 👉3विठ्ठल ममताबादे
उरण दि 3 जुलै श्रावण म्हटलं की निसर्गाची वेगवेगळी रूपं आपल्याला पहायला मिळतात. याच श्रावण महिन्यातील हिंदू धर्माचा पहिला सण म्हणजेच नागपंचमी. या नागपंचमीचे महोस्तवामध्ये रूपांतर करून उरण तालुक्यातील मोठी जुई शाळेने हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या सणाबद्दल विविध प्रकारच्या आख्यायिका असल्या तरी प्रत्यक्षात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. नागाची पिंडी आणून त्याचें यथोविधी पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर यांनी केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक संजय होळकर यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी यांचे शब्द सुमनाने स्वागत करून कार्यक्रमाबद्दल प्रास्ताविक करताना ‘साप’ हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यामुळे आपण त्याच्याकडे चांगल्या भावनेने पाहिले पाहिजे. जर काही साप आढळले. तर त्यांना न मारता आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्पमित्रांना बोलवून त्यांना जंगलामध्ये सोडून दिले पाहिजे. तसेच सापाविषयी भीती बाळगू नये. श्रावण महिन्यातील व्रत वैकल्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन शाळेचे विज्ञान शिक्षक यतीन म्हात्रे यांनी केले. तर भूतकाळातील नागपंचमी विषयी सुंदर कथा या कार्यक्रमाच्या प्रमुख शर्मिला पाटील यांनी केले.
त्यानंतर दुपारच्या सत्रानंतर नागांच्या पिंडीचे दिंडीद्वारे वाजत गाजत पूजन करून विसर्जन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मार्गदर्शिका रंजना म्हात्रे, दर्शन पाटील,संदीप गावंड सर व श्रीमती ज्योती बामणकर, शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक, महिला बचत गट यांनी विशेष मेहनत घेतली. शेवटी.आभार दर्शन पाटील यांनी मानून उपक्रमाची सांगता केली.