लोकदर्शन (जिल्हा चंद्रपूर) प्रतिनिधि 👉अशोककुमार भगत,
माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक नि डालमिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिमेंट उद्योगामुळेगामुळे नावारूपास आलेल्या गडचांदूर या उद्योगनगरीत व परिसरात सुरू असलेले अवैध धंदे पाहता, हिमालयाचं टोक गाठल्याचे दृष्टिगोचर होत आहे.
परिसरात सिमेंट उद्योग आल्याने, देशभरातील सारे तज्ञ अभियंते, कुशल नि अकुशल कामगारांचा लोंढा या परिसरात स्थिरावला. परिणामी, या भागात वैध नि अवैध धंदे सुरू करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येते.
खाणीतून निघणारा कोळसा नि पुढे त्याची वाहतूक करतांना तस्करांनी गावोगावी मुख्य रस्त्यावर अवैध स्टॉल उभे करून अवैध माया कमावण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे.
वरली-मटका गडचांदूरच काय, तर कोरपनासह तालुक्यातील पन्नासावर गावात बिनबोभाटपणे सुरू आहे.
यापूर्वी, गडचांदूर, कोरपना, वनसडी येथील देशी दारू दुकानातून कथिततरित्या गावोगावी अवैधरित्या दारू पुरवठा केला जायचा असा जनतेचा आरोप होता.
हल्ली मात्र, थेट चंद्रपूरातून तालुक्यातील दारू तस्कर पुरवठा करीत असल्याचे बोलले जाते. यामुळे, गडचांदूर नि तालुक्यातील देशी दारू दुकानदार ही नाराज असल्याची माहिती आहे.
आश्चर्याची बाब अशी की, शासनाने हे अवैध धंदे बंद करण्याची, किमान आळा घालण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर सोपवली ती यंत्रणाच डोळे मिटून आहे. हे डोळे मिटण्यामागे अर्थकारण असल्याचा गंभीर आरोप जनतेचा आहे.
दुसरी बाब म्हणजे, प्रशासनाची अशी मुजोरी असतांना शासनातील लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करीत असतील, तर लक्ष द्यायचे कुणी? असा गंभीर सवाल आता उपस्थित झाला आहे.